नगर : प्रतिनिधी
काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी सुजय विखे माजी खासदार होणार असल्याचे राजकीय भाकित वर्तवले आहे. नगर दक्षिणमधून माजी आमदार निलेश लंके दीड लाख मतांनी निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नगर जिल्ह्यातील नगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघात काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांची महाविकास आघाडीत महत्त्वाची भूमिका राहिली.
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ सभांचा धुरळा उडवला होता. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुका संपल्यानंतर बाळासाहेब थोरात तिरुवनंतपूरममध्ये पद्मनाथम मंदिरात होते. तिथे त्यांच्याशी मराठी माणसांनी संवाद साधून देशातील आणि राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा केली. यानंतर त्यांनी तेथून देशात आणि राज्यात काँग्रेसचे सरकार येणार असल्याचे भाकित केले.
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महायुती भाजपचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे आता, माजी खासदार होतील, असे सांगून माजी आमदार निलेश लंके दीड लाख मतांनी निवडून येतील, असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे. याशिवाय राज्यात महाविकास आघाडीच्या ३१ जागा निवडून येतील, असाही राजकीय अंदाज त्यांनी वर्तविला आहे.
काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत, आमदार रोहित पवार यांच्याबरोबर सभा घेतल्या होत्या. थोरात यांनी या सभांमधून विखे यांच्या राजकारणावर प्रहार केले होते. यातून नगर जिल्ह्यात पुन्हा विखे-थोरात वाद रंगला होता. थोरात यांनी पूर्ण तयारी असल्याचे सांगून विखे यांना आव्हान दिले होते.