विरोधक आज रस्त्यावर, राज्यात शिवसेनेचे आंदोलन
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्र, राज्य सरकारच्या विरोधात गल्ली ते दिल्ली हल्लाबोल करण्याचा निर्धार विरोधकांनी केला आहे. हनीट्रॅप प्रकरणासह वेगवेगळ््या कारणांमुळे वादाच्या भोव-यात अडकलेले मंत्री यासह विविध मुद्यांवरून ठाकरेंची शिवसेना उद्या रस्त्यावर उतरणार आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन केले जाणार आहे. स्वत: उद्धव ठाकरे दादरमधील आंदोलनात सहभागी होणार आहेत. दुसरीकडे दिल्लीत इंडिया आघाडीचे खासदार केंद्रीय निवडणूक आयोगावर मोर्चा काढणार आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या डोळ््याला पट्टी आणि तोंडामध्ये बोळा आहे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी आज तीव्र आगपाखड केली. हे आंदोलन सरकारविरोधातील विविध मुद्यांवर लक्ष केंद्रित करेल आणि विरोधकांकडून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगण्यात आले. निवडणूक आयोगाने मतदार यादीतून वगळलेल्या मतदारांची स्वतंत्र यादी देण्यास नकार दिला आहे. बिहारमधील मतदार याद्यांचा आयोगाने आढावा घेतला आहे. यासंबंधी सुप्रीम कोर्टात खटलादेखील सुरू आहे. या खटल्यादरम्यान आपली भूमिका मांडताना आयोगाने वगळलेल्या मतदारांची स्वतंत्र यादी देण्याचे आमच्यावर नियमाचे बंधन नाही, असे म्हटले. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने यासंबंधी याचिका दाखल केली आहे. त्यांनीच अशा वगळलेल्या मतदारांची स्वतंत्र यादी दिली जावी, अशी मागणी केली. निवडणूक आयोगाच्या या भूमिकेमुळे मतदार यादीतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक झाले असून, सोमवारी निवडणूक आयोगावर मोर्चा धडकणार आहे.