एकावेळी एकाच वॉर्डची मतमोजणी करण्यात येणार असल्याने या वेळी महापालिका निवडणुकीचे निकाल रखडण्याची शक्यता आहे. वॉर्डनिहाय मतमोजणी होणार असल्यामुळे साधारणपणे दुपारी स्पष्ट होणारे निकालाचे चित्र मध्यरात्रीपर्यंत स्पष्ट होईल की नाही याची शाश्वती नसल्याचे अधिकारी सांगत आहेत. या विषयी व्यवस्थापन मात्र अजून संभ्रमातच आहे. नेमकी मतमोजणी कोणत्या पद्धतीने करायची याच्या मार्गदर्शन सूचना तातडीने जारी कराव्यात, यासाठी त्यांनी राज्य निवडणूक आयोगाला पत्र पाठवले आहे. १६ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून जर एकावेळी एकाच वॉर्डची मतमोजणी करण्यात आली तर या संपूर्ण मतमोजणीसाठी भरपूर वेळ लागेल. एका प्रभागाच्या मतमोजणीसाठी साधारणत: एक ते दीड तासांचा कालावधी गृहीत धरला तर ज्या शहरात अधिक प्रभाग आहेत तिथले निकाल मध्यरात्रीपर्यंत तरी लागतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ज्या महापालिकांचे कमी प्रभाग आहेत तिथले चित्र संध्याकाळपर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता आहे; पण राज्यातील मोठ्या महापालिकांचे निकाल हाती येण्यास उशीर लागू शकतो. ही प्रक्रिया लांबल्यास पालिका व पोलिस यंत्रणेवर ताण येण्याची शक्यता आहे. मतमोजणीवरील आक्षेप आणि वाद पाहता ही प्रक्रिया आणखी वेळखाऊ ठरणार असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे.
मुंबईत २२७ प्रभाग असून त्यासाठी २३ विभाग निवडणूक कार्यालये आहेत. प्रत्येक निवडणूक कार्यालयांतर्गत ८-१० प्रभागांची मतमोजणी प्रक्रिया होईल. ईव्हीएमच्या मतमोजणीपूर्वी टपाली मतांची मोजणी करणे आवश्यक असल्यामुळे त्यासाठी अर्धा ते एक तास लागेल. एका प्रभागातील सुमारे ७ हजार मतांची मोजणी करण्यासाठी किमान दीड ते दोन तासांचा कालावधी आवश्यक आहे. काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र पाठवून याबाबत आक्षेप नोंदवला आहे. या पद्धतीमुळे एका निर्णय अधिका-याच्या कार्यक्षेत्रात ८ प्रभाग असतील तर प्रत्येक प्रभागासाठी सरासरी ३ तास धरले तरी आठव्या प्रभागाचा निकाल येण्यासाठी २४ तासांहून अधिक कालावधी लागू शकतो. परिणामी संपूर्ण मुंबईचे निकाल जाहीर होण्यास दुसरा दिवस उजाडण्याची शक्यता नाकारता येत नाही. एवढ्या मोठ्या कालावधीसाठी उमेदवार आणि मतदारांना ताटकळत ठेवावे लागेल. जे लोकशाही प्रक्रियेच्या दृष्टीने योग्य नाही, असे या पत्रात म्हटले आहे. मुंबई पालिकेने मात्र एकावेळी एका प्रभागाची मतमोजणी केल्याने निकालात विलंब होण्याच्या शक्यतेचा इन्कार केला आहे.
निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रत्येक विभाग कार्यालयांमध्ये सुमारे २८ टेबल लावण्यात येणार आहेत. एका प्रभागाची मोजणी सुरू झाली तरी सर्व टेबलवर होणार असल्याने अर्ध्या ते एका तासात निकाल लागेल. एकावेळी केवळ एका प्रभागाची मतमोजणी केल्यामुळे निवडणुकीचे निकाल रखडणार आहेत त्यामुळे पालिकेने यासाठी योग्य मार्ग शोधावा, असे काही उमेदवारांचे म्हणणे आहे. निकाल लवकरात लवकर जाहीर करण्यासाठी पूर्वीप्रमाणेच सर्व प्रभागांमध्ये एकाच वेळी मतमोजणी सुरू करणे अधिक परिणामकारक ठरेल, असे मत व्यक्त होत आहे. महापालिका निवडणुकांच्या मतदानाला आता केवळ ३ दिवस शिल्लक आहेत त्यामुळे प्रचाराचा जोर वाढला आहे. उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करीत आहेत. पक्षनेते एका दिवसात तीन-तीन, चार-चार सभा घेत आहेत. असे असले तरी अनेक ठिकाणी बेबनाव पहायला मिळतो आहे. काही ठिकाणी सत्ताधारी भाजप काँग्रेसबरोबर तर काही ठिकाणी जातीय संस्था असणा-या एमआयएमबरोबर युती करून सत्ता हस्तगत करत आहे. राजकारणाचा सर्वत्र चिखल झाला असून कोण कुठे आहे हे समजेनासे झाले आहे.
वर्षानुवर्षे काँग्रेसमध्ये सत्ता भोगून नेतृत्व करणारे ज्येष्ठ नेते भाजपमध्ये जात आहेत. भाजपकडे तर रांग लागली आहे. या पूर्वीचे निष्ठावंत भाजप नेते, कार्यकर्ते मागे पडत चालले आहेत. आता पुढे तिस-या टप्प्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये युती-आघाड्यांचा बोजवारा वाढणार असल्याचे चित्र आहे. सर्वच राजकीय पक्षात साधनसूचिता राहिली नसून बेबनाव निर्माण झाला आहे. केवळ सत्ता हे एकच ध्येय समोर ठेऊन युत्या-आघाड्या होत आहेत. जिल्हा परिषद निवडणूक म्हणजे संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्राचे चित्र असते. येथेही सत्ता मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या महापालिका निवडणूक प्रचाराला प्रचंड वेग आला असून विविध माध्यमातून उमेदवारांचे जोरदार शक्तिप्रदर्शन सुरू आहे. मोठ्या संख्येने पदयात्रा, सभा, रॅली होत असल्या तरी या प्रचारासाठी जमवण्यात आलेल्या गर्दीत ख-या प्रामाणिक कार्यकर्त्यांचा चेहरा मात्र हरवलेला दिसत आहे. उमेदवारांनी जमवलेली ही गर्दी म्हणजे भाड्याने आणलेल्या माणसांची जत्राच असल्याचे चित्र सध्या सर्वत्र पहायला मिळत आहे.
भाड्याने जमवलेल्या गर्दीत प्रचाराचा तो उत्साह आणि जोश दिसत नसल्याने पक्षाच्या नेतृत्वातही चिंता वाढत चालली आहे. या मागील मुख्य कारण म्हणजे निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाल्यापासून सर्वच राजकीय पक्षात उमेदवारीसाठी मोठ्या प्रमाणावर झालेले पक्षांतर. निष्ठावंत, वर्षानुवर्षे पक्षासाठी झटणा-या कार्यकर्त्यांना डावलून केवळ जिंकण्याची क्षमता आणि प्रतिमा असलेला चेहरा हाच एकमेव निकष ठेऊन तिकिट वाटप करण्यात आले. परिणामी, पक्षांतर करून आलेले नवे चेहरे तुपाशी आणि जुने निष्ठावंत कार्यकर्ते उपाशी, असे चित्र सर्वच पक्षांत स्पष्टपणे दिसून आले. याचाच परिणाम म्हणून सर्वच राजकीय पक्षांमध्ये बंडखोरी उफाळून आली. युती आणि आघाडीतील गोंधळ अधिकच स्पष्ट होत आहे. बाहेरून युती-आघाडीचा गाजावाजा, संयुक्त सभा आणि एकत्रित प्रचार दिसत असला तरी प्रत्यक्षात मात्र इतरत्र कुणालाही मत द्या; पण एक हक्काचे मत माझ्या पारड्यात टाका, असा छुपा वैयक्तिक प्रचार अनेक उमेदवार करत असल्याचे चित्र आहे.
एकीकडे पॅनल पद्धतीने एकदिलाने मतदान व्हावे, यासाठी पक्ष प्रयत्नशील असताना काही उमेदवार मात्र आपले जुने हिशोब चुकता करण्यासाठी पक्षविरोधी भूमिका घेताना दिसत आहेत. काही प्रभागांमध्ये युतीतीलच उमेदवार एकमेकांविरोधात अप्रत्यक्ष प्रचार करत असल्याची चर्चा आहे. मी निवडून आलो पाहिजे, बाकी कोण जिंको वा हरो त्याची जबाबदारी पक्षाची, अशी मानसिकता उमेदवारांमध्ये बळावत चालल्याने युती-आघाडीतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. त्याचा थेट परिणाम मतदारांच्या मानसिकतेवर होत आहे. जर उमेदवाराचाच युतीवर विश्वास नसेल तर मतदारांनी तरी तो का ठेवावा?

