कॉंग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक, जबाबदारी केली निश्चित
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची आज पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत वरिष्ठ नेते, पदाधिका-यांनी आपापल्या राज्यात थांबून बूथ स्तरापर्यंत जाण्याचा आदेश देतानाच पक्षाचा संघटनात्मक बांधणीचा रोडमॅप दिला आहे. एवढेच नव्हे, तर पक्षातील पदाधिका-यांवर जबाबदारी सोपविताना आता उत्तरदायित्वही निश्चित केले जाणार असून, निवडणूक परिणामास संबंधित राज्यांच्या प्रभारींना जबाबदार धरले जाणार आहे, असे सांगण्यात आले.
कॉंग्रेस पक्षाचे महासचिव-प्रभारींवर संबंधित राज्यांच्या संघटन मजबुतीची जबाबदारी असेल. ही जबाबदारी देताना निवडणूक परिणामाचे उत्तरदायित्वही स्वीकारावे लागेल, असे सांगतानाच कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मुख्य विरोधी पक्षनेता या नात्याने लोकांचे प्रश्न सातत्याने मांडून सतत संघर्षात्मक भूमिका घेतानाच जनआंदोलन करून लोकांची पहिली पसंद बनावे लागेल, असे म्हटले. या बैठकीला कॉंग्रेस नेते राहुल गांधी, खा. प्रियंका गांधी, कु. शैलजा, के. सी. वेणुगोपाल आदी नेते उपस्थित होते.
राज्यांमध्ये पक्षाला संघटनात्मक नवे रूप देणे आणि भविष्यात होणा-या सर्व निवडणुकांबाबत त्यांना जबाबदार धरणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी पक्षाच्या प्रभारींनी संबंधित राज्यांत थांबून बूथपर्यंत पक्षीय संघटन मजबूत करण्यावर भर द्यावा, ही सर्व जबाबदारी प्रभारींची असेल, असेही खरगे म्हणाले.
पक्षीय संघटनात्मक
फेरबदलाचे संकेत
कॉंग्रेसचे नवे मुख्यालय ९ ए कोटला मार्ग येथे झालेल्या बैठकीत कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षात आणखी संघटनात्मक बदलाचे संकेत दिले. पक्षीय पातळीवर आपल्याला आणखी संघटनात्मक बदल करावे लागतील, असे ते म्हणाले.