महाराष्ट्राचे उदाहरण देत राहुल गांधींची पुन्हा टीका
बोस्टन : वृत्तसंस्था
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी अमेरिकेच्या दौ-यावर आहेत. या दौ-यात त्यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा मुद्दा उपस्थित केला. भारतातील निवडणूक प्रक्रिया गंभीर समस्या असल्याचा हल्ला राहुल गांधी यांनी केला. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे उदाहरण दिले. भारतीय निवडणूक आयोगाशी तडजोड केली आहे. त्यामुळे या व्यवस्थेत नक्कीच गडबड आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
ते बोस्टनमधील विद्यापीठात एका चर्चासत्रात बोलत होते. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत एकूण मतदारांमध्ये तरुण मतदान करणा-यांची संख्या जास्त आहे. निवडणूक आयोगाने आम्हाला संध्याकाळी ५:३० वाजेपर्यंतचा मतदानाचा डेटा दिला. परंतु त्यानंतर संध्याकाळी ५:३० ते ७:३० वाजेपर्यंत जेव्हा मतदान संपायला हवे होते, तेव्हा ६५ लाख मतदारांनी मतदान केले. हा प्रकार अचंबित करणारा आहे. कारण एका मतदाराला मतदान करण्यासाठी सुमारे ३ मिनिटे लागतात. मग तुम्ही गणना केली तर याचा अर्थ मतदार पहाटे २ वाजेपर्यंत रांगेत उभे होते. म्हणजेच महाराष्ट्रातील निवडणुकीत रात्रभर मतदान सुरु होते का. पण प्रत्यक्षात तसे झाले नाही.
सरकारने कायदाच बदलला
राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत व्हिडिओ चित्रिकरणचा मुद्दाही मांडला. ते म्हणाले, आम्ही निवडणूक आयोगाला विचारले की, व्हिडिओग्राफी होत आहे का, त्यांनी केवळ व्हिडिओग्राफीला नकार दिला नाही, तर कायदाही बदलला, म्हणून आता तुम्ही व्हिडिओग्राफीची मागणी करू शकत नसल्याचे सांगितले.
लोकशाहीची बदनामी
थांबवावी : मुख्यमंत्री
महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली अशा लागोपाठच्या निवडणुका राहुल गांधी हरले आहेत. या पराभवामुळे त्यांच्या मनावर परिणाम झालेला दिसत आहे. त्यामुळेच ते परदेशात जाऊन भारताची, संविधानाने तयार केलेल्या लोकशाही संस्थांची बदनामी करत आहेत. त्यांनी ही बदनामी थांबवावी, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.