29.2 C
Latur
Saturday, June 29, 2024
Home‘नीट’ पेपरफुटीत ३०० कोटींची उलाढाल!

‘नीट’ पेपरफुटीत ३०० कोटींची उलाढाल!

विशाल चौरसियाने प्रश्नपत्रिका फोडल्याचा बिजेंदर गुप्ताचा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
बिहार लोकसेवा आयोगाने शिक्षक भरतीसाठी घेतलेल्या परीक्षेचे तसेच ओडिशात ज्युनिअर इंजिनिअर पदांच्या भरतीसाठी घेतलेल्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फोडणा-या विशाल चौरसिया यानेच नीट-यूजीचीही प्रश्नपत्रिका फोडली असण्याची शक्यता आहे, असा दावा बिजेंदर गुप्ता याने केला.

एका नियतकालिकाने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये त्याने प्रश्नपत्रिका फोडणा-यांबद्दल सांगितले की, ‘वो जेल जायेंगे, फिर बेल और फिर शुरू होगा खेल’. नीट-यूजीची प्रश्नपत्रिका फोडून ती ७०० विद्यार्थ्यांना देण्यात येणार होती.

त्यातून सुमारे २०० ते ३०० कोटी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता होती असाही दावा गुप्ता याने केला. बिजेंदर गुप्ता याआधी काही परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फोडण्याच्या गुन्ह्यांत सहभागी होता. त्याला पोलिसांनी दोनदा अटक केली होती.

बिजेंदर गुप्ता याने सांगितले की, नीट-यूजीची प्रश्नपत्रिका फोडण्याच्या प्रकरणातील सूत्रधार संजीव मुखिया बेपत्ता असून तो कदाचित पोलिसांच्या हाती लागणार नाही. या प्रकरणात बिहार पोलिसांच्या ईओयूचा तपास योग्य दिशेने सुरू होता. स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नपत्रिका जिथे छापल्या जातात त्या सरकारी मुद्रणालयातील कर्मचा-यांशी संधान साधले जाते तसेच या परीक्षा यंत्रणेतील काही लोकांना हाताशी धरण्यात येते. मग प्रश्नपत्रिका फोडल्या जातात. परीक्षा यंत्रणेतील गैरव्यवहारांमुळे काळ्या यादीत टाकण्यात आलेल्या कंपन्याही निविदा प्रक्रियेमध्ये चुकीच्या गोष्टी घडवून आणण्यास मागेपुढे पाहात नाहीत.

बिजेंदर गुप्ता याने सांगितले की, प्रश्नपत्रिका फोडण्यामध्ये कुख्यात असलेला एक गुंड उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील रहिवासी आहे. त्याचा साथीदार म्हणून मी काम केले होते. एका उमेदवाराला आम्ही प्रश्नपत्रिका फोडून नंतर नोकरी मिळवून देण्यासाठी मदत केली. या प्रकरणात आम्हाला तुरुंगात जावे लागले होते. आता हा गुंड उत्तर प्रदेशमध्ये आमदार आहे, अशी माहिती ब्रिजेंद्र गुप्ता याने दिली.

मुखियावर ३० कोटींचे कर्ज
परीक्षा माफिया गुप्ता याने दावा केला की, बिहारमधील प्रश्नपत्रिका फोडण्याच्या प्रकरणाचा सूत्रधार संजीव मुखिया हा गेल्या १० वर्षापासून कर्जात बुडालेला आहे. त्याच्यावर सुमारे ३० कोटी रुपयांचे कर्ज आहे. मात्र प्रश्नपत्रिका फोडण्याचे गुन्हे तो करतच राहिला. शिक्षक भरतीसाठी बिहार लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडल्याबद्दल संजीव मुखियाचा मुलगा शिव याला याआधीच अटक करण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR