लातूर : प्रतिनिधी
लातूर तालुक्यातील मुरुड व मुरुड महसूल मंडळात ढगफुटीसदृश्य पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी गुरुवारी पाहणी केली. येथे पुरपरिस्थिती निर्माण झाल्याने श्री दत्त मंदिरात स्थलांतरित करण्यात आलेल्या नागरिकांची, नुकसानग्रस्त शेतक-यांची व व्यापा-यांची भेट घेवून त्यांना धीर दिला. मंगळवारी रात्री अवघ्या चार तासात १०९ मिलीलिटर पाऊस झाल्याने शेतक-यांच्या काढणीला आलेल्या आणि काढून ठेवलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहेत. शिवाय, व्यापारी, दुकानदारांच्या दुकानात पाणी शिरल्याने त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.
घरात पाणी शिरल्याने ३०० हून अधिक नागरिकांना श्री दत्त मंदिरात स्थलांतरित करावे लागले. या सर्व परिस्थितीची पाहणी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केली. स्थलांतरित नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या कीटचेही यावेळी वाटप करण्यात आले. यावेळी लातूरचे तहसीलदार सौदागर तांदळे, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप जाधव, मंडळ कृषी अधिकारी योगेश मुळजे, तालुका कृषी अधिकारी दिलीप राऊत, तलाठी कमलाकर आरडले आदींसह काँग्रेस व महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
मुरुड आणि महसूल मंडळात हातातोंडाशी आलेले सोयाबीन व इतर पिकांचे नुकसान झाले आहे. काढून ठेवलेले सोयाबीन वाहून गेले आहे. नदी नाल्यालगतच्या पिक व जमिनीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सर्व शेतक-यांना सरसकट भरीव आर्थिक मदत मिळाली पाहिजे. शहरातील अण्णा भाऊ
साठे चौक येथील दुकानात पाणी शिरून नुकसान झालेल्या किराना, कापड, फुटवेअर, फर्निचर आदी ४० हून अधिक दुकानांची पाहणी केली. या नुकसानीची पंचनामे करून नुकसानग्रस्तांना एनडीआरएफ निकषांप्रमाणे सरकारने मदत द्यावी, अशी मागणी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केली.