मुंबई : प्रतिनिधी
औरंगजेबाच्या कबरीवरून नागपूरमध्ये हिंसाचार, जाळपोळ पाहायला मिळाली. यावर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेत महत्त्वाचे विधान केले. या दंग्यामध्ये गाड्यांचे नुकसान झाले, ३३ पोलिस जखमी झाले आहेत. ज्यांच्या गाड्या जाळल्या त्यांना येत्या तीन-चार दिवसांत त्यांना नुकसानभरपाई दिली जाणार आहे.
आंदोलकांकडून प्रतिकात्मक कबर जाळत असताना आयत लिहिलेली चादर जाळल्याचा अपप्रचार काही लोकांनी केला. यानंतर जमाव आला. त्यांनी लोकांवर दगडफेक केली, जाळपोळ केली. पोलिसांवर हल्ला केला. पोलिसांनी लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या अशा प्रतिकात्मक गोष्टी केल्या. यातील सीसीटीव्ही फुटेज, खासगी चित्रीकरण पोलिसांकडे देण्यात आले. यातून आरोपींची ओळख पटवली जात असल्याचे गृहमंत्री फडणवीस म्हणाले.
१०४ लोकांना आतापर्यंत अटक करण्यात आली. यातील ९२ लोकांवर कारवाई सुरू आहे. १२ जण अल्पवयीन असून त्यांच्यावर त्याप्रमाणे कार्यवाही सुरू आहे. दंगा करणारे, त्यांना मदत करणा-या सर्वांवर कारवाई सुरू आहे. सोशल मीडियाचे मोठ्या प्रमाणात ट्रॅकिंग सुरू आहे. ही घटना घडावी अशा पोस्ट करणा-यांना सहआरोपी केले जाणार आहे. ६८ पोस्ट आतापर्यंत तपासल्या असून त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. भडकवणा-या पॉडकास्ट केलेल्यांवर कारवाई होईल, असेही ते यावेळी म्हणाले.
ज्यांच्या गाड्या जाळल्या त्यांना येत्या ३-४ दिवसांत नुकसानभरपाई दिली जाणार आहे. आपण काही निर्बंध घातले आहेत, त्याचा जनजीवनावर, व्यापारावर परिणाम होतोय. त्यात शिथिलता आणली जाईल. पण पोलिस सजग आहेत. आता झालेले नुकसान दंगेखोरांकडून वसूल केले जाईल. दंगेखोरांनी पैसे भरले नाहीत तर त्यांची प्रॉपर्टी विकली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.
दंगेखोरांना सरळ केले नाही तर त्यांना तशी सवय पडेल. याप्रकरणी कोणताही टॉलरन्स सहन केला जाणार नाही, असेही फडणवीस म्हणाले.