लातूर : प्रतिनिधी
सरत्या वर्षाला निरोप देण्यासोबतच नूतन वर्षाच्या स्वागताचा रविवारी रात्री लातूर शहरात जल्लोष होता. थर्टी फर्स्टच्या अनुषंगाने केलेल्या नियोजनानुसार पार्ट्यांना सुरुवात झाली. शहरातील सर्वच हॉटेल, भेळ, पाणीपुरी, पावभाजीच्या गाड्यांवर गर्दी होती. यात युवक, युवतींचा मोठा सहभाग होता. रात्री १२ वाजल्यानंतर एकच जल्लोष झाला. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. हॅपी न्यू इयर..चा संदेश एकमेकांना देत जल्लोष साजरा करण्यात आला. प्रतीवर्षाप्रमाणे याही वर्षी लातूर शहरात मावळत्या वर्षाला निरोप देतानाच नूतन वर्षाचे उत्साहाच्या वातावरणात स्वागत करण्यात आले. रविवार सुटीचा दिवस असल्यामुळे अनेकांनी थर्टी फर्स्टचे दिवसभर नियोजन केले होते. ठिकठिकाणी पार्ट्यांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले होते. रिसॉर्ट, हॉटेल, बीअर बार, ढाबे विद्युत रोषणाईने लखलखून गेले होते. सर्वच हॉटेल, रिसॉर्ट, बारमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती. आईस्क्रीम पार्लरही हाऊस फुल्ल होते.
नववर्षानिमित्त केकचे दर आणि मागणीही वाढली
नववर्षाचे स्वागत प्रत्येक जण आपापल्यापरीने करीत असतो. कोणी सहलीवर जात तर कोणी मित्रांसोबत पार्टी एन्जॉय करीत असतात.; परंतु सर्वांसाठीच नववर्षाचा जल्लोष केकशिवाय अपूर्ण असतो. आजच्या जमान्यात आनंद द्विगुणीत करण्याकरिता केक कापला जातो. यामुळे केकची मागणी दिवसेंदिवस वाढत चाललेली दिसून येत आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी लातूर शहरात विविध ठिकाणी नानाविध प्रकारच्या केकेचे स्टॉल सजले. केकचे दर आणि मागणीही वाढल्याचे दिसून आले.
लातूर शहरातील विविध बेकरी आणि स्टॉलवर ताजे आणि स्वादिष्ट केक उपलब्ध झाले. त्यात वेगवेगळ्या फ्लेव्हरमध्ये चॉकलेट, पायनापल, बटरस्कॉच, ब्लॅकफॉरेस्ट, रसमलाई फ्लेवर केक, नवनवीन डिझाईनमध्ये नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, असा मजकुर असलेले केक सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत. येथील गंज गोलाईतील स्टार बेकरीमध्ये अर्धा किलोचा साधा केक १५० रुपये ते २०० रुपये, एक किलोचा केक २५० रुपये ते ३५० रुपये, आईस केक अर्धा किलो २५० रुपये ते ४०० रुपये, आईस केक एक किलो ३०० रुपये ते ५०० रुपयांना असल्याची माहिती राम रेड्डी यांनी दिली. गंज गोलाईतीलच बेंगलोर बेकरीमध्ये अर्धा किलोचा साधा केक २०० रुपये, एक किलोचा केक ४०० रुपये, अर्धा किलोचा आईस केक ३०० रुपये, एक किलोचा आईस केक ६०० रुपयांना होता.