काठमांडू : वृत्तसंस्था
नेपाळमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. भूस्खलन आणि पुरामध्ये नेपाळमध्ये कमीतकमी ११२ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण बेपत्ता आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. नेपाळमध्ये गुरुवारपासून पाऊस धुमाकूळ घालत आहे. अनेक भागात जोरदार पाऊस बरसत आहे.
नेपाळला पुराचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. अद्याप ७९ जण बेपत्ता आहे. काठमांडू खो-यातील १६ जण बेपत्ता आहेत. आतापर्यंत ३००० लोकांना वाचवण्यात यश आले आहे. अनेक शहरांमध्ये पाणी साचले आहे. सध्या देशातील ६३ ठिकाणचे राष्ट्रीय महामार्ग ब्लॉक झाले आहेत. नेपाळमध्ये अनेक भागात विजेचा पुरवठा खंडित झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, काठमांडूमधील २२६ गावे पाण्याखाली गेले आहेत.
कार्यकारी पंतप्रधान आणि नगर विकास मंत्री प्रकाश मान सिंह यांनी मंत्र्यांसोबत तातडीची बैठक घेतली. संबंधित मंत्री आणि अधिका-यांना युद्ध पातळीवर हालचाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुसळधार पावसामुळे नेपाळमधील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आणि नियोजित परीक्षा पुढे ढकलण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत.
नेपाळमधील पावसाचा बिहारला धोका
नेपाळमधील मुसळधार पावसामुळे बिहार सरकारने राज्याच्या उत्तर भागात पुराचा धोका जाहीर केला आहे. गंडक, कोसी, महानंदा आणि इतर नद्यांचा प्रवाह वाढला आहे. त्यामुळे नदी क्षेत्रातील गावांना पुराचा इशारा देण्यात आला आहे. नद्यांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने बिहारमधील १३ जिल्ह्यांना फटका बसला असून यामुळे १,४१,००० लोक प्रभावित झाले आहेत.