काठमांडू : वृत्तसंस्था
नेपाळ सरकार लग्नाची सध्याची वयोमर्यादा कमी करण्याच्या तयारीत आहे. शेजारील देश लग्नाचे किमान वय २० वर्षांवरून १८ वर्ष करण्याच्या तयारीत आहे. मीडिया रिपोटर््सनुसार, लग्नाच्या वयामुळे देशात बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे सरकारचे मत आहे. अशा परिस्थितीत नेपाळ सरकार लग्नाची वयोमर्यादा कमी करण्याची किंवा बालविवाहावरील दंडाची सध्याची रक्कम कमी करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी बाल कायदा आणि फौजदारी संहितेत सुधारणा केली जाऊ शकते.
नेपाळचे कायदामंत्री अजय चौरसिया यांनी सांगितले की, सरकार चालू अधिवेशनात विधेयकाची नोंदणी करण्याचे काम करत आहे. केंद्रीय गृहमंत्री रमेश लेखक यांनी संसदेच्या विधी, न्याय आणि मानवी हक्क समितीसमोर स्पष्टीकरण देताना सांगितले की, सरकार दुरुस्तीला अंतिम स्वरूप देत आहे. सध्याची वयोमर्यादा पुरेशी ठरत नाही. ती कमी व्हायला हवी. सरकार दोन पद्धतींवर काम करत आहे. प्रथम, किमान वय कमी करा किंवा दुसरे, अमेरिकेच्या धर्तीवर रोमियो आणि ज्युलियट कायद्याची निवड करा.
फौजदारी संहितेनुसार दोन्ही पक्षांचे वय २० वर्ष पूर्ण झाल्यावरच विवाह केला जातो. कलम १७३ नुसार कायद्याचे उल्लंघन करणा-या व्यक्तीला जास्तीत जास्त तीन वर्ष तुरुंगवास आणि जास्तीत जास्त ३० हजार रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते. त्याचप्रमाणे फौजदारी संहितेनुसार १८ वर्षांखालील मुलीशी संमतीने शारीरिक संबंध ठेवणे हा बलात्कार मानला जातो. त्यामुळे १८ वर्षांखालील मुलींशी प्रेमविवाह किंवा सहमतीने विवाह करणा-या शेकडो मुलांवर बालविवाह आणि बलात्काराचे आरोप झाले आहेत.