लातूर : प्रतिनिधी
वसंत ऋतूमधील निसर्गाचे फुलांचे पक्ष्याचे हे सगळे सौंदर्य टिपण्याची दृष्टी नवीन पिढीला मिळावी म्हणून सह्याद्री देवराई, सनराईज योगा स्टुडिओ आणि हॉटेल ग्रँड सरोवर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १९ मार्च रोजी नैसर्गिक रंगाची आणि फुलांची उधळण करत रंगपंचमी साजरी करुन हा संदेश उपस्थित शेकडो महिलांनी दिला.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. आरती झंवर आणि डॉ. नम्रता जाजू होत्या. तत्पूर्वी सनराईज योगा स्टुडिओ संचालिका आणि सह्याद्री देवराईच्या सदस्या नंदिनी पडिले यांनी या उपक्रमामागची भूमिका मांडली. पाणी हेच जीवन आहे. पाणी आहे तर आपले या ग्रहावर वास्तव्य आहे आणि म्हणून पाण्याचा -हास टाळणे आज गरजेचे आहे आणि म्हणून आम्ही सर्वजणी सह्याद्री देवराईचे सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्यापासून सह्याद्री देवराईपासून प्रेरणा घेऊन आज आगळावेगळा निसर्गोत्सव साजरा केला आहे.
सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी फोन करुन या आगळ्यावेगळ्या उपक्रमा बद्दल सर्व महिला भगिनींनी व त्यांनी राबवलेल्या पर्यावरण पूरक रंगपंचमीचे कौतुक केले. या सर्व महिलांनी दीडशे पेक्षा जास्त दुर्मिळ वनस्पतींची माहितीदेखील संकलित केली आणि ही माहिती पुस्तिका सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्याकडे सुपूर्द करणार आहेत. हा उपक्रम सकाळी ६ ते ८ या वेळामध्ये हाँटेल ग्रॅड परिसरात करण्यात आला. यावेळी डॉ. आरती झंवर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
अतिशय खेळीमेळीचे वातावरणात सकाळी योगा नृत्य तसेच फुल उधळत सूर्याचे ऋण, या ब्रम्हांडाचे ऋण व्यक्त करत हा निसर्ग उत्सव नैसर्गिक रंगाने व फुलांने साजरा करण्यात आला. वृक्ष वेली जतन करा, झाडे भेट देऊन सण साजरे करा, असे आवाहन करण्यात आले.