मुंबई : प्रतिनिधी
फेब्रुवारी महिन्यात नॉनव्हेज थाळीच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली असल्याचा अहवाल उ१्र२्र’ कडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. विशेषत: मटण आणि चिकनच्या किंमतीत वाढ झाल्याने नॉनव्हेज खवय्यांसाठी हा धक्का मानला जात आहे. अहवालानुसार, गेल्या महिन्यात नॉनव्हेज थाळीच्या किमतीत तब्बल ६ टक्के वाढ झाली आहे. ब्रॉयलर चिकनच्या दरात १५ टक्क्यांची वाढ झाल्याने सामान्य ग्राहकांच्या खिशावर याचा मोठा परिणाम झाला आहे.
त्याच वेळी, शाकाहारी थाळी तुलनेने स्वस्त झाली आहे. कारण पालेभाज्यांच्या किमती कमी झाल्या आहेत. मात्र, काही आवश्यक वस्तू महागल्याने एकूणच खर्चाचा समतोल साधला गेला नाही. खाद्यतेलाच्या किमती वाढल्याने महागाईचा ताण कायम आहे.
फेब्रुवारी महिन्यात टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे. जानेवारी महिन्यात ३२ रुपये किलो असलेला टोमॅटो फेब्रुवारीमध्ये २३ रुपयांवर आला. याचबरोबर घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीतही १०० रुपयांची कपात झाली आहे. त्यामुळे शाकाहारी थाळीच्या किमतीत १ टक्क्याची घट झाली आहे.
मात्र, कांदा, बटाटा आणि खाद्यतेल यांसारख्या अत्यावश्यक वस्तूंच्या किमतीत अपेक्षित घट झालेली नाही. कांद्याचे दर ११ टक्क्यांनी, बटाट्याचे १६ टक्क्यांनी, तर खाद्यतेलाचे दर १८ टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे शाकाहारी थाळी पूर्णत: स्वस्त झाली असे म्हणता येणार नाही.
यंदा शेतीत चांगले उत्पादन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, उन्हाळ्यात अन्नधान्य आणि भाज्यांचा पुरवठा सुरळीत ठेवणे आणि खाद्यपदार्थांच्या किमती नियंत्रणात ठेवणे हे सरकारपुढील मोठे आव्हान असेल. महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ
नॉनव्हेज थाळीच्या किमतीत मोठी वाढ झाल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. ब्रॉयलर चिकनच्या किमतीत १५ टक्के वाढ झाली असून, त्याला कारणीभूत ठरले आहे कोंबडी खाद्य (मका आणि इतर खाद्यपदार्थ) महागणे. तसेच, व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ झाल्याने हॉटेल आणि ढाब्यांमध्ये नॉनव्हेज पदार्थांचे दर वाढले आहेत. यामुळे सामान्य ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडत आहे.