पंतप्रधान मोदी, पंतप्रधान कार्यालयाचा पत्ता बदलला
गुलामगिरीच्या मानसिकतेतून
आता मुक्त व्हायला हवे
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन पंतप्रधान कार्यालय सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवन १ आणि २ चे उद्घाटन केले. त्यामुळे आता पंतप्रधान कार्यालयाचा पत्ता आजपासून बदलला आहे. आतापर्यंत पंतप्रधान कार्यालय साउथ ब्लॉकमध्ये होते. यासंदर्भात बोलताना पंतप्रधान मोदी यांनी नॉर्थ ब्लॉक आणि साउथ ब्लॉक इमारती ब्रिटिश राजवटीचे प्रतीक होत्या. गुलामगिरीच्या भारताच्या भूमीवर ब्रिटिश महाराजांचे स्वप्न साकार करण्यासाठी या इमारती माध्यम म्हणून काम करत होत्या. आपल्याला गुलामगिरीच्या या मानसिकतेतून मुक्त होणे आवश्यक असल्याचे म्हटले.
दिल्लीच्या इमारती आणि ऐतिहासिक स्थळे गुलामगिरीच्या खुणांनी भरलेली आहेत. स्वतंत्र भारतात शहीद झालेल्या सैनिकांचे स्मारक नव्हते. २०१४ मध्ये भारत देशाने गुलामगिरीची मानसिकता आता सहन केली जाणार नाही, असा निर्णय घेतला. या निर्णयांमागे आमची सेवाभावी भावना आहे, असे मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदी यांनी आज सकाळी सेवा तीर्थ संकुलाचे उद्घाटन केले. आता त्यात पंतप्रधान कार्यालय (पीएमओ), राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय (एनएससीएस) आणि कॅबिनेट सचिवालय असेल. आजपासून पंतप्रधान कार्यालय रायसीना हिलवरील साउथ ब्लॉकमधून सेवा तीर्थ येथे हलविण्यात आल्याचे सांगण्यात आले.
पंतप्रधानांचे कार्यालय १९४७ पासून साउथ ब्लॉकमध्ये आहे. ही इमारत जवळजवळ ७८ वर्षांपासून देशातील सत्तेचे केंद्र आहे. २०१४ पासून मोदी सरकारने ब्रिटिश राजवटीच्या प्रतिकांपासून दूर जाण्यासाठी सातत्याने पावले उचलली असल्याचे सांगण्यात आले.
सेवा तीर्थवर नागरिक
देवो भव हा मंत्र
उद्घाटनाच्या वेळी पंतप्रधानांनी नवीन संकुलात सेवा तीर्थला समर्पित फलकाचे अनावरण केले. संकुलाच्या भिंतीवर देवनागरी लिपीत सेवा तीर्थ असा शिलालेख कोरलेला आहे. त्याखाली नागरिक देवो भव हा मंत्र देखील कोरलेला आहे.
लखपती दीदींचे
उद्दिष्ट आता दुप्पट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेवा तीर्थवरून लखपती दीदी योजनेबाबत मोठा निर्णय घेतला. पीएम राहत योजनेअंतर्गत लखपती दीदींचे उद्दिष्ट दुप्पट करून ६ कोटी करण्यात आले आहे. तसेच कृषी पायाभूत सुविधा निधी दुप्पट करून २ लाख कोटी करण्यात आला. १० हजार कोटी रुपयांच्या निधीसह स्टार्टअप इंडिया फंड ऑफ फंड्स २.० सुरू करण्यात आला.

