लातूर : प्रतिनिधी
नोकर भरतीसाठी महाबँक कर्मचा-यांचे देशभरात क्षेत्रिय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी बँकेचे कर्मवारी आक्रमक झाले होते. बँक ऑफ महाराष्ट्रमधील देशभरातील एआयबीइएचे सभासद २० मार्च रोजी एक दिवसाच्या देशव्यापी संपावर जात आहेत. हा संप प्रामुख्याने सर्व स्तरातील कर्मचा-यांच्या भरतीसाठी आहे. बँकेने २०२१ मध्ये सफाई कर्मचारी हे पदच रद्द केले. हे काम आऊटसोर्स केले. त्यांना किमान वेतनदेखील दिले जात नाही. कायम स्वरुपी कामगारांचे फायदे जसे की रजा, मेडिकल , सुट्ट्या कांहीच मिळत नाही. या पदावर अनेक वर्षांपासून तात्पुरत्या पदावर काम करणारे हजारो कर्मचारी यामुळे रस्त्यावर आले आहेत.
बँकेत ७०० शाखेतून नियमित शिपाई नेमण्यात आलेले नाहीत. बँकेत ३१८ शाखा आहेत जेथे एकही क्लार्क नेमण्यात आला नाही. १२९० शाखा आहेत जेथे केवळ एक क्लार्क आहे जो कॅशमध्ये काम करतो. यामुळे कर्मचा-यांना वेळ संपली तरी जास्त वेळ बसून काम पूर्ण करून जावे लागते. सुट्टीच्या दिवशी कामावर यावे लागते. आजारपण असो की सांसारिक जबाबदा-या यासाठी आवश्यकतेनुसार राजा मिळत नाही. काम आणि वैयक्तिक आयुष्य यातील समतोल बिघडला आहे. कर्मचारी सतत ताण-तणावात काम करत आहेत. त्यामुळे सतत आजारी पडत आहेत असे बँक कर्मचा-यांचे नेते कॉम्रेड उत्तम होळीकर म्हणाले. आज महा बँकेतील कर्मचा-यांनी आंदोलनाचा एक कार्यक्रम झोनल ऑफिस समोर धरणे या अंतर्गत महा बँकेच्या लातूर स्थित औसा रोड येथील येथील झोनल ऑफिस समोर दुपारी १२ ते सायंकाळी ५ पर्यंत धरणे धरली व सायंकाळी पाच वाजता स्थानिक इतर बँकेतील कर्मचा-यांच्या सहभागातून प्रखर निदर्शने केली ज्यात ५० पेक्षा अधिक कर्मचारी सहभागी झाले होते.
महा बँकेच्या धरणे कार्यक्रमाला पाठिंबा दर्शविण्यासाठी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनीलकुमार हाके, ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनंत सूर्यवंशी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. संजय मोरे, आम आदमी पक्षाचे कॉ. विक्रांत शंके, ग्रामीण बँक अधिकारी संघटनेचे कॉम्रेड राहुल सावंत व कॉम्रेड प्रीतम गिरी गोसावी, एआयबीईओचे कॉ. विवेक पदरे, नोबोचे संतोष मोलगे इत्यादी सर्वांनी उपस्थित समुदायास मार्गदर्शन करून कर्मचा-यांच्या न्याय मागण्यासाठी त्यांच्या संघटनांचा व पक्षांचा पाठिंबा बँक ऑफ महाराष्ट्र मधील कर्मचा-यांच्या संघटनेस जाहीर केला. महाबँकेच्या ग्राहकांनी आमची भूमिका समजून घ्यावी आणि आमच्या संपाला पाठिंबा द्यावा असे संघटनेतर्फे नम्र आवाहन करण्यात आले आहे. हा धरणे कार्यक्रम यशस्वी करण्यात कॉम्रेड महेश घोडके, कॉम्रेड गजानन औटी, कॉ. उदय मोरे, कॉ. सुधीर मोरे इत्यादींनी परिश्रम घेतले.