पंतप्रधान मोदी, आयएनएस विक्रांतवर नौदलासोबत दिवाळी
पणजी : वृत्तसंस्था
भारताच्या तिन्ही सैन्य दलात असलेल्या असाधारण समन्वयामुळे पाकिस्तानला विक्रमी वेळेत गुडघे टेकायला भाग पाडले. काही महिन्यांपूर्वी तर आयएनएस विक्रांत या नुसत्या नावानेच पाकिस्तानची झोप उडाली. आपल्या सशस्त्र दलांनी जमिनीवर, समुद्रात आणि हवेत, प्रत्येक परिस्थितीत अत्यंत संवेदनशीलतेने सेवा दिली आहे. त्यात भारतीय नौदलाने परदेशात अडकलेल्या लोकांना परत आणण्यासाठी मोहिमा राबविल्या. मुळात तुमच्या शौर्य आणि धाडसामुळेच जगभरातील भारतीयांचा आत्मविश्वास बळकट झाला आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी गोव्यात आयएनएस विक्रांतवरील नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी केली. पंतप्रधानांनी सैनिकांसोबत दिवाळी साजरी करण्याची ही १२ वी वेळ आहे. मी कालपासून तुमच्यामध्ये आहे. तुमच्या प्रत्येकाकडून मी काही तरी शिकलो आहे. मला काही तरी कळले आहे. खोल समुद्रातील रात्र आणि सूर्योदयाने माझी दिवाळी अनेक प्रकारे खास बनवली आहे. जहाज लोखंडाचे आहे, पण तुम्ही जेव्हा त्यात उतरता तेव्हा त्यात शौर्य उतरते, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी नौदलाचे कौतुक केले.
ऑपरेशन सिंदूरमध्ये तिन्ही दलांमधील प्रचंड समन्वयामुळे पाकिस्तानला शरणागती पत्करण्यास भाग पाडले. आज आयएनएस विक्रांतच्या शौर्यस्थळावरून मी पुन्हा एकदा तिन्ही दलांच्या सैनिकांना सलाम करतो. जेव्हा शत्रू उपस्थित असतो, तेव्हा ज्या देशाकडे स्वत:हून युद्ध लढण्याची ताकद असते, तोच देश वरचढ ठरतो. सशस्त्र दलांना बळकटी देण्यासाठी, स्वावलंबी असणे आवश्यक आहे, असे सांगतानाच ज्या दिवशी देशाला स्वदेशी आयएनएस विक्रांत मिळाली, त्या दिवशी नौदलाने गुलामगिरीचे एक प्रमुख प्रतीक सोडून दिले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने नौदलाने एक नवीन ध्वज स्वीकारला. आज, आपली युद्धनौका विक्रांत स्वावलंबी भारत आणि मेड इन इंडियाचे एक प्रमुख प्रतीक आहे. समुद्रातून जाणारी स्वदेशी आयएनएस विक्रांत भारताच्या लष्करी क्षमतेचे प्रतिबिंब आहे. विक्रांतने अलीकडेच पाकिस्तानची रात्रीची झोप उडवली, असे मोदी म्हणाले.
गेल्या वर्षी पंतप्रधानांनी गुजरातमधील कच्छला भेट दिली होती. तिथे त्यांनी बीएसएफ, लष्कर, नौदल आणि हवाई दलातील सैनिकांना मिठाई वाटली होती. गेल्या ११ वर्षांत पंतप्रधानांनी दिवाळीसाठी जम्मू आणि काश्मीरला जास्त म्हणजेच चार वेळा भेट दिली.
संरक्षण निर्यातीत
तब्बल ३० पट वाढ
देशात अलिकडे सरासरी ४० दिवसांनी एक नवीन स्वदेशी युद्धनौका आणि पाणबुडी नौदलात सहभागी होत आहे. आमच्या ब्रम्होस आणि आकाश मिसाइलने ऑपरेशन सिंदूरवेळी आपली क्षमता सिद्ध केली. मागच्या एक दशकात आपली संरक्षण निर्यात ३० पटीने वाढली. यात सर्वात मोठे यश डिफेन्स स्टार्टअपचे आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.