नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारताच्या ताफ्यात आता राफेलची संख्या वाढू लागली आहे. फ्रान्सची कंपनी एकेक करून हवाई दलाला राफेल पुरवत आहे. राफेल खरेदीत झालेल्या घोटाळ्यामुळे ही डील वादग्रस्त ठरली होती. तरीही मोदी सरकारने यातील त्रुटी दूर करून ही डील पूर्ण करत भारताचे संरक्षण भक्कम करण्याकडे पाऊल टाकले. आता नौदलाला देखील राफेलची ताकद देण्यासाठी पुढे पाऊल टाकले आहे.
भारत सरकार नौदलासाठी सक्षम असलेली २६ राफेल लढाऊ विमाने खरेदी करणार आहे. यासाठी ६४ हजार कोटींची डील मंजूर करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील सुरक्षा विषयक कॅबिनेटने ही मंजुरी दिली. ही विमाने आयएनएस विक्रांतवर तैनात केली जाणार आहेत.
एक पायलट असलेली २२ विमाने आणि दोन सीट असलेली चार विमाने यात असणार आहेत. येत्या काही दिवसांत या करारावर हस्ताक्षर होणार आहेत. या डीलमध्ये केवळ विमानेच नाहीत तर त्यांना लागणारी शस्त्रे, स्टिमुलेटर, झुलत्या जहाजांवर उतरण्यासाठी लागणारी यंत्रणा आदी गोष्टींचा समावेश असणार आहे. यामध्ये पायलट ट्रेनिंग आणि लॉजिस्टिक सपोर्टदेखील असणार आहे.
भारतीय हवाई दलाला २०१६ मध्ये केलेल्या ५९ हजार कोटींच्या डीलनुसार ३६ राफेल लढाऊ विमाने देण्यात येत आहेत. काही विमाने हवाई दलाच्या ताफ्यात आली आहेत. आता जी नौदलाची विमाने आहेत ती देखील २०३०-३१ पर्यंत भारताला मिळणार आहेत. भारतीय नौदलाकडे सध्या रशियन बनावटीची मिग २९ के ही ४० विमाने आहेत. २००९ मध्ये नौदलाला ४५ विमाने मिळाली होती. त्या पैकी पाच अपघातग्रस्त झालेली आहेत.