सर्वोच्च न्यायालयातील कोर्टरूममध्येच एका वकिलाने सोमवारी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ खटल्याची सुनावणी करत असताना ही घटना घडली. राकेश किशोर नामक ७१ वर्षीय वकिलाने व्यासपीठाजवळ जाऊन आपला बूट काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी न्यायालयातील सुरक्षा कर्मचा-यांनी हस्तक्षेप करून वकिलाला दालनाबाहेर काढले. बार कॉन्सिलने या प्रकरणी कडक पवित्रा घेत सरन्यायाधीशांवर हल्ला करणारे वकील राकेश किशोर यांना निलंबित केले असून देशात कुठेही वकिली करण्याला बंदी घालताना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. हल्ल्याच्या प्रकारानंतर सरन्यायाधीशांनी न्यायालयाचे कामकाज सुरूच ठेवत या प्रकाराने विचलित होऊ नका, आम्हीही विचलित होणार नाही.
या प्रकाराने माझ्यावर कोणताही परिणाम होणार नाही असे सांगितले. या घटनेचा देशभरातून निषेध केला जात आहे. सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्या. के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर एका प्रकरणाची सुनावणी सुरू असताना ही घटना घडली. दिल्लीतील मयूर विहार येथे राहणारे वकील राकेश किशोर सुनावणी सुरू असताना न्यायाधीशांसमोर गेले. त्यांनी बूट काढून सरन्यायाधीशांच्या दिशेने फेकण्याचा प्रयत्न केला. वकिलाला दालनाबाहेर काढत असताना तो ‘भारत सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत होता. सुरक्षा पथकाकडून या घटनेची चौकशी सुरू आहे. कोर्टरूममध्ये उपस्थित असलेल्यांनी हा सारा प्रकार प्रत्यक्ष पाहिला. वकिलीचा पेहराव घातलेल्या व्यक्तीने बूट फेकण्याचा प्रयत्न केल्याचे काहींचे म्हणणे आहे. तर काहींनी हल्लेखोराने कागदाचे बोळे फेकल्याचे म्हटले आहे. आता सर्वोच्च न्यायालयाच्या सुरक्षा युनिटने घटनेची चौकशी सुरू केली आहे.
हल्लेखोर वकील असे का वागला, हे अद्याप समजले नाही. राकेश किशोरची सर्वोच्च न्यायालयाच्या बारमध्ये २०११ पासूनची नोंदणी आहे. राकेश किशोरचा सरन्यायाधीशांवर रोष का याबाबत असे बोलले जाते की, मध्य प्रदेशातील खजुराहो येथे भगवान विष्णूच्या ७ फूट उंच शिरच्छेदित पुतळ्याच्या जीर्णोद्धारावर सरन्यायाधीश यांच्या टिप्पणीमुळे वकील नाराज असावा. १६ सप्टेंबर रोजी तोडफोड केलेल्या पुतळ्याच्या जीर्णोद्धाराची मागणी करणारी याचिका फेटाळताना सरन्यायाधीशांनी केलेल्या टिप्पण्यामुळे वकील राकेश किशोर नाराज असल्याचे बोलले जाते. भगवान विष्णूच्या भग्नावस्थेतील मूर्तीचे पुनरुज्जीवित करण्याचे आदेश द्यावेत अशी याचिका फेटाळून लावताना, तुम्ही आता भगवान विष्णूलाच साकडे घाला, अशा आशयाची टिप्पणी सरन्यायाधीशांनी केली होती. ही टिप्पणी राकेश किशोर याच्या जिव्हारी लागली असावी. त्या संतापातून त्यांनी हे कृत्य केल्याचे म्हटले जात आहे. हा प्रकार अनपेक्षित असल्याने कक्षात उपस्थित असलेले वकील भांबावून गेले. मात्र सरन्यायाधीश अत्यंत अविचल राहिले. त्यांनी सुनावणी सुरू ठेवण्याची सूचना केली.
विचलित होऊ नका, अशा प्रकारच्या घटना मला माझ्या कर्तव्यापासून विचलित करू शकत नाहीत असे सरन्यायाधीश गवई म्हणाले. या घटनेनंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, सरन्यायाधीशांवर झालेला हल्ला प्रत्येक भारतीयाला संताप आणणारा आहे. अशा निंदनीय कृत्यांना आपल्या समाजात कोणतेही स्थान नाही. ते पूर्णपणे निंदनीय आहे. मोदींनी सरन्यायाधीश गवई यांच्याशी संवाद साधून, त्यांनी अशा परिस्थितीतही दाखवलेल्या शांतपणाचे कौतुक केले. सरन्यायाधीश गवई आणि सर्वोच्च न्यायालयाने या वकिलावर कोणतेही आरोप व कारवाई न करण्याचा निर्णय घेतल्याने त्याला पोलिसांनी नंतर सोडून दिले. सरन्यायाधीशांनी तुटलेल्या मूर्तीच्या जीर्णोद्धाराची मागणी करणारी याचिका फेटाळून लावताना ‘जा आणि देवाला स्वत:हून ते करायला सांगा. तुम्ही भगवान विष्णूचे कट्टर भक्त असल्याचा दावा करता म्हणून जा आणि त्यांची प्रार्थना करा’ असे म्हटले होते.
या वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यावर तसेच सोशल मीडियावर उलटसुलट प्रतिक्रिया येऊ लागल्यानंतर सरन्यायाधीशांनी ‘मी सर्व धर्मांचा सन्मान करतो’ असे स्पष्टीकरण दिले होते. मात्र सरन्यायाधीशांनी केलेल्या याच टिप्पणीमुळे वकिलाने संताप व्यक्त करत हा हल्ला केल्याची चर्चा आहे. घडलेल्या प्रकाराबद्दल चिंता व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, आपल्या देशात पेरले जाणारे विष आता संविधानाच्या सर्वोच्च संस्थांनाही जुमानत नाही, ही देशासाठी धोक्याची घंटा आहे. लोकशाही आणि संविधानाच्या मूल्यांना आधार मानून वाद-प्रतिवादातून न्याय्य भूमिकेकडे जाण्यासाठी न्यायव्यवस्था असते. त्याच न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च संस्थेत मुख्य न्यायमूर्तीवरच अशा प्रकारे हल्ल्याचा प्रयत्न होणे, हा केवळ न्यायव्यवस्थेवरचाच नव्हे तर लोकशाहीचा, संविधानाचा आणि देशाचा घोर अवमान आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांवर हल्ला करण्याचा प्रयत्न लज्जास्पद आणि घृणास्पद आहे. हा आपल्या न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेवर आणि कायद्याच्या राज्यावर हल्ला आहे.
जेव्हा एखादी व्यक्ती गुणवत्ता, सचोटी आणि चिकाटीने देशाच्या सर्वोच्च न्यायिक पदावर पोहोचते आणि त्यांना अशा प्रकारे लक्ष्य केले जाते, तेव्हा ते एक गंभीर संदेश देते. संविधानाचे रक्षण करण्यासाठी सामाजिक अडथळे तोडणा-या माणसाला धमकावण्याचा आणि अपमानित करण्याचा प्रयत्न हे प्रतिबिंबित करते. अशा निर्लज्ज कृत्याने गेल्या दशकात आपल्या समाजाला कसे द्वेष आणि धर्मांधतेने ग्रासले आहे हे दर्शविते. काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी म्हणाल्या, सरन्यायाधीशांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी केवळ शब्द पुरेसे नाहीत. त्यांच्यावर झालेला हल्ला केवळ त्यांच्यावर नव्हे तर आपल्या संविधानावरही हल्ला आहे. सरन्यायाधीश गवई हे खूप दयाळू आहेत, देशाने त्यांच्यासोबत एकजुटीने, तीव्र संतापाने उभे राहिले पाहिजे. खरे तर आता हल्लेखोरांना, गुन्हेगारांना कसली भीतीच उरलेली नाही. पोलिसांवरही हल्ले केले जात आहेत.