गडचिरोली : सरन्यायाधीशांच्या प्रोटोकॉलचा मुद्दा देशभर गाजत असतानाच गडचिरोलीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अहेरी तालुका मुख्यालयातही न्यायाधीशांना असुविधांचा सामना करावा लागल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चक्क दिवाणी न्यायाधीश चार दिवसांपासून बोअरमधील साप मेलेले दूषित पाणी पित होते. दूषित पाणी प्यायल्याने त्यांची प्रकृती बिघडली असून, शासकीय निवासस्थान सोडण्याची नामुष्की त्यांच्यावर आली आहे.
अहेरी येथील दिवाणी न्यायालयाचे कनिष्ठ स्तरावरील न्यायाधीश शाहीद साजीदुजम्मा एम. एच. यांच्या शासकीय निवासस्थानी असलेल्या बोअरवेलच्या आजूबाजूला काहीतरी सडल्यासारखा वास येत होता. सुरुवातीला त्यांनी याकडे फारसं लक्ष दिलं नाही. मात्र, सलग तीन दिवस हा वास सहन करत असताना त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीदरम्यान पाण्यामधून संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर याप्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली.
त्यानंतर न्यायाधीशांच्या घरामागील बोअरवेलची तपासणी करण्यात आली. यावेळी बोअरवेलमध्ये मृत साप सडलेल्या अवस्थेत असल्याचे समजले. बोअरमध्ये साप मृत झाला असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी दिवसभरासाठी निवासस्थान सोडले.
दरम्यान न्यायाधीश शाहीद साजीदुजम्मा यांनी यासंदर्भात अहेरी नगरपंचायतच्या मुख्याधिका-यांशी संपर्क साधला. मात्र, त्यांनी न्यायाधीशांना प्रतिसाद दिला नाही. अखेर त्यांनी आलापल्ली येथील एका खासगी व्यक्तीला बोलावून बोअरवेलमधून तो सडलेला साप बाहेर काढायला लावला. तेव्हा मर्सिबल मशिन बाहेर काढले असता, तिथे साप अडकून मेल्याचे आढळले.
न्यायाधीशांच्या तक्रारींकडेच दुर्लक्ष केले जात असेल आणि प्रशासनाकडून त्यांना कोणताही प्रतिसाद मिळत नसेल, तर सामान्य नागरिकांच्या बाबतीत काय परिस्थिती असेल, हे विचारायलाच नको, अशी भावना न्यायाधीश शाहीद साजीदुजम्मा यांनी व्यक्त केली.