चंदिगड : वृत्तसंस्था
पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला कठोर शब्दांत फटकारल्यानंतर प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याच्या हालचाली आता सुरु झाल्या आहेत.
हरियाणाप्रमाणे गेल्या दोन-तीन वर्षांपासून महाराष्ट्रातही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात आलेल्या नाहीत. यामुळे आता महाराष्ट्राच्याही आशा पल्लवीत होणार आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हरियाणा निवडणूक आयोगाने पंचायत विभागाला आदेश देत ईव्हीएम लवकरात लवकर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिका-यांकडे सोपविण्यास सांगितले आहे.
आयोगाने राज्यातील सर्व जिल्हाधिका-यांना आदेश दिले आहेत. फरीदाबादला मतदान यादी आणि विधानसभा स्तरावरील मतदान केंद्रांमध्ये बदल किंवा अद्ययावत केल्यानंतर अहवाल देण्यास सांगितले आहे. जिल्हा प्रशासनाने देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने हालचाली सुरु केल्या आहेत. यामुळे राज्य निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.