26.4 C
Latur
Wednesday, March 26, 2025
Homeमुख्य बातम्यान्या. यशवंत वर्माविरुद्ध महाभियोगाची मागणी

न्या. यशवंत वर्माविरुद्ध महाभियोगाची मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरी सापडलेल्या १५ कोटींच्या रोकडप्रकरणी त्यांच्याविरुद्ध महाभियोग चालवण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी आक्रमक मागणी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनने केली. सरकारने यासाठी शिफारस करावी, असेही बार असोसिएशनने म्हटले आहे. दरम्यान, न्या. वर्मा यांची अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली करण्याच्या निर्णयाविरुद्ध संप पुकारण्याचा इशारा वकिलांनी दिला आहे.

बार असोसिएशन अध्यक्ष अनिल तिवारी यांनी या प्रकरणात गुन्हे दाखल करून त्याची सीबीआय आणि ईडीसह इतर संस्थांमार्फत चौकशी करण्याची तत्काळ परवानगी द्यावी, असे नमूद केले. गरज पडल्यास वर्मा यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्याची परवानगी द्या, अशी आक्रमक मागणीही त्यांनी केली.

सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील कॉलेजियमने सोमवारी वादग्रस्त न्यायाधीश वर्मा याची अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली करण्यासंबंधीच्या निर्णयाची पुष्टी केली. दरम्यान, राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी रोख रकमेच्या प्रकरणात सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी तातडीने घेतलेल्या निर्णयांची प्रशंसा केली. याप्रकरणी भाजपचे नेते जे. पी. नड्डा आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी झालेल्या बैठकीत धनखड यांनी समितीचा अहवाल येईपर्यंत वाट पाहण्याचा निर्णय घेतला असल्याचेही ते म्हणाले.

या प्रकरणात बहुतांश विरोधी पक्षांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून, या प्रकरणाची निष्पक्षपातीपणे चौकशी करण्याची मागणी केली आहे. न्या. वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालवला जावा, असा सल्लाही नेत्यांनी दिला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR