बीड : प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथे दसरा मेळाव्याच्या ठिकाणी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आणि सध्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेला वाल्मिक कराड याचे पोस्टर झळकल्याचे दिसून आले आहे.
भगवान भक्तिगडावर पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा सुरू आहे. दसरा मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित आहेत. पंकजा मुंडे सकाळी ११ वाजता हेलिकॉप्टरने मेळाव्याच्या ठिकाणी दाखल झाल्या. त्यांनी राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले, पूजा व आरती केली. यावेळी धनंजय मुंडे आणि लक्ष्मण हाके यांचीही उपस्थिती आहे. मुंडे समर्थक आणि भगवान बाबा भक्त मोठ्या संख्येने या मेळाव्याला हजर राहिले आहेत. अशातच आता या दसरा मेळाव्यात यंदा एक वादग्रस्त प्रसंग घडल्याने चर्चांना चांगलेच उधाण आले आहे.
बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथे होणा-या दसरा मेळाव्याच्या ठिकाणी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आणि सध्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेला वाल्मिक कराड याचे पोस्टर झळकल्याचे दिसून आले. या पोस्टरवर ‘‘ही २४स्रस्रङ्म१३ ६ं’े्र‘ ंल्लल्लं, कराड आमचे दैवत’’ असा मजकूर झळकत आहे, कराडच्या समर्थकांनी हे पोस्टर झळकवल्याची माहिती समोर येत आहे. पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यात वाल्मिक कराडचे पोस्टर झळकल्याने चर्चांना उधाण आले आहे.
अंजली दमानिया यांची टीका
याबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, मला हे ऐकून अतिशय धक्का बसला आहे. एक सुद्धा बॅनर झळकले असेल तर आपण सर्वांनी मान शरमेने खाली घालणे गरजेचे आहे. या राजकारणात आता इतकी विकृती आली आहे. लोकांच्या मानसिकतेत इतकी विकृती आली आहे. इतक्या खालच्या दर्जाचे कृत्य करून सुद्धा या लोकांचे अशा पद्धतीचे बॅनर झळकत असतील तर पंकजा मुंडे यांना घेराव घालून याबाबत प्रश्न विचारला पाहिजे. यावर तुमचे म्हणणे काय? असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.