मुल्लानपूर : वृत्तसंस्था
राजस्थान रॉयल्सने आयपीएल २०२५ मध्ये शानदार पुनरागमन करीत सलग दुसरा विजय नोंदवला. संजू सॅमसनच्या संघाने हंगामातील त्यांच्या चौथ्या सामन्यात पंजाब किंग्जचा ५० धावांनी पराभव केला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाबच्या संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर या पराभवाचा सामना करावा लागला.
शनिवारी ५ एप्रिल रोजी पंजाबच्या नवीन घर मुल्लानपूर येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात यजमान पंजाब किंग्ज उत्कृष्ट फॉर्ममध्ये आले. नवा कर्णधार श्रेयस अय्यर आणि नवा प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग यांच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्जने हंगामातील सुरुवातीचे दोन्ही सामने एकतर्फी जिंकले. राजस्थानला पहिल्या दोन सामन्यात दारुण पराभव पत्करावा लागला होता. पण तिस-या सामन्यात संघाने विजय मिळवला. अशा परिस्थितीत, पॉइंट टेबलमध्ये मोठी उलथापालथ झाली. पंजाब किंग्ज चौथ्या स्थानवर घसरला तर राजस्थान रॉयल्स सातव्या क्रमांकावर आला आहे.
२०६ धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना पंजाबची सुरुवात खूपच खराब झाली. पहिल्याच षटकात जोफ्रा आर्चरने प्रियांश आर्य आणि कर्णधार श्रेयस अय्यरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर चौथ्या षटकात मार्कस स्टोइनिसही आऊट झाला. त्याच्या बॅटमधून फक्त एक धाव आली.
कार्तिकेयने सातव्या षटकात प्रभसिमरनला शिकार बनवले. यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि नेहल वधेरा यांच्यात एक शानदार भागीदारी झाली. नेहलने ६२ धावांची खेळी केली. मॅक्सवेलनेही ३० धावा केल्या. पण दोघेही एकामागोमाग आऊट झाले. यानंतर पंजाबचा एकही फलंदाज टिकू शकला नाही आणि पंजाबला २० षटकांत फक्त १५५ धावा करता आल्या. या पराभवानंतर पंजाबचा विजय रथ थांबला आहे.