लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील पंढरपूर येथे अमावास्येच्या रात्री गुप्तधनाच्या लालसेने १ एप्रिल रोजी रात्री ९ च्या नंतर जादूटोण्याचा प्रकार घडला. गावक-यांच्या सतर्कतेने पोलिसांत तीन पुरुष व एक महिला यांच्या विरोधात जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दखल झाला आहे. महा. अंनिस प्रतिनिधी राजकुमार भंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. पोलिस प्रशासनाचे महा. अंनिस कडून हार्दिक अभिनंदन.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, परवा अमावास्येच्या रात्री ९ च्या नंतर पंढरपूर या गावी पडक्या चिरेबंदी वाड्याच्या बाजूला अगतिकता आणि अंधश्रद्धेतून मंत्र-तंत्राच्या आधारे जमिनीतील गुप्तधन मिळवण्याच्या भाबड्या आशेपोटी तीन पुरुष आणि एक महिला यांनी फावडे, काळे टोपले त्यात पाणी बॉटल, दुधाचे पाकीट, काळ्या बाहुल्या, हळदी, कुंकू, लाल करदोडा आणि इतर पूजेचे साहित्य मांडून मंत्र-तंत्राच्या आधारे इच्छित साध्य करण्याचा डाव मांडला असताना अंधा-या रात्री संशयास्पद हरकती करताना दिसून आल्याने गावातील सजग नागरिकांनी पोलिसांना ही खबर दिली. पोलिसांनी गांभीर्य लक्षात घेऊन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध जादूटोणाविरोधी कायदा कलम ३ प्रमाणे गुन्हा नोंद केला.
महा. अनिसचे प्रतिनिधी राजकुमार भंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन तेथील वस्तुस्थिती समजून घेतली. या प्रकरणी ज्या नागरिकांनी पोलिसांना खबर दिली आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन गुन्हा नोंद केला त्याबद्दल पोलिस प्रशासन आणि नागरिकांचे महा. अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे यांनी अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्र शासनाने जादूटोणाविरोधी कायदा मंजूर केला तरीही ग्रामीण भागापासून ते उच्च न्यायालयाच्या गेटपर्यंत अलीकडच्या काळात असे अंधश्रद्धेचे प्रकार अधिक वाढताना दिसत आहेत. अज्ञान, अंधश्रद्धेचे वाढत चाललेले प्रकार यावर प्रभावी उपाय म्हणजे शासन पातळीवर कायद्याचे नियम मंजूर करून कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि प्रबोधन मोहीम राबवणे हे होय.
महाराष्ट्र अंनिस ही राज्यभर त्यांच्या कुवतीप्रमाणे सातत्याने कर्तव्य भावनेतून प्रबोधन करीत आहे. मात्र शासन पातळीवर संपूर्ण राज्यभर एक प्रभावी प्रबोधन मोहीम राबवली तर महा. अंनिस ही साधन व्यक्तीच्या माध्यमातून शासनाला सहकार्य करायला केव्हाही तयार आहे. विशेषत: ग्राम पातळीवर पोलिसांसह गावचे सरपंच, पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांना त्या त्या पोलिस ठाण्यांतर्गत प्रशिक्षण दिले. ग्रामसभेच्या माध्यमातूनही गावागावांत कायद्याचे प्रबोधन झाले तर अशा प्रकारावर आळा बसेल असे वाटते. महा. अंनिसने या कायद्याच्या चित्रमय पुस्तिका तयार केल्या आहेत. त्या त्यांच्यापर्यंत पोचल्या तर कायद्याचा धाक बसू शकेल असा विश्वास वाटतो. हे शासनाच्या इच्छाशक्तीवर अवलंबून आहे. ती इच्छाशक्ती शासनाने दाखवावी अशी या निमित्ताने आठवण करून देण्यात येत आहे.
आमिषाला बळी पडू नये
जमिनीतील गुप्त धन यावर शासनाचा अधिकार असतो. त्यामुळे जनतेने पैशाचा पाऊस पाडतो, गुप्तधन मिळवून देतो, तुमच्या इच्छापूर्ती करून देतो असे आमिष दाखवणा-या भोंदू बुवा-बाबाच्या अमिषाला बळी पडू नये असे जाहीर आवाहनही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात येत आहे.