23.8 C
Latur
Monday, August 11, 2025
Homeलातूरपकडलेल्या टोळीकडून ९ गुन्ह्यांची उकल

पकडलेल्या टोळीकडून ९ गुन्ह्यांची उकल

लातूर : प्रतिनिधी
मागच्या आठवड्यात दि. २ ते ३ ऑगस्टच्या मध्यरात्री रात्रगस्त दरम्यान औसा व भादा पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने बीड जिल्ह्यातील एका सराईत गुन्हेगाराच्या टोळीला घातक शस्त्रासह ताब्यात घेतले होते. या पकडलेल्या टोळीकडून ९ गुन्ह्याची उकल व २४ लाख ८० हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले असल्याची माहीती जिल्हा पोलीस अधिक्षक अमोल तांबे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
  दिनांक २ ते ३ ऑगस्टच्या मध्यरात्री रात्रगस्त दरम्यान औसा व भादा पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने बीड जिल्ह्यातील एका सराईत टोळीतील घातक शस्त्रासह रिहान मुस्तफा शेख, वय २० वर्ष, रा. गौतम नगर, परळी जि. बीड, अन्वर जलालखा पठाण, वय २४ वर्ष, रा. गौतम नगर, परळी जि. बीड, हाफीज मुमताजुद्दीन शेख, वय ३६ वर्ष, रा. आझाद नगर, परळी जि. बीड, सादिक मोहम्मद यासीन मोहम्मद, वय ४४ वर्ष रा. जुना बाजार बीड, फारुख नबी शेख, वय २७ वर्ष राहणार बार्शी नाका बीड यांना त्यांच्या मालवाहू लीलँड टेम्पो क्रमांक एम. एच. ४४ यु ३२९८ व त्यामध्ये दरोडा टाकण्यासाठी उपयोगात आणण्यासाठी बाळगलेले धारदार लोखंडी शस्त्रे, काठ्या, कटावणी, लोखंडी पाईप, तीन बनावट नंबर प्लेट, ग्राइंडर मशीन, लोखंडी साखळी व इतर साहित्यासह अटक करण्यात आली होती. तर त्यांच्यासोबतचे इतर तीन आरोपी अंधाराचा फायदा घेऊन प्रसार झाले होते. नमूद आरोपींनी औसा, किल्लारी, भादा, रेणापूर, चाकूर, वाढवणा अहमदपूर तसेच शेजारील राज्यांमध्ये घरपोडीचे गुन्हे केल्याचे कबूल केले होते. फरार आरोपीच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथके रवाना करण्यात आले होते.
नमूद अटक आरोपींची १० दिवस पोलीस कोठडी मिळवून वरिष्ठांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, भादा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महावीर जाधव यांनी त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी लातूर जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चोरीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे तसेच भादा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे एकूण ५ पथके तयार करून त्यांना सूचना देऊन रवाना करण्यात आले होते.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील ३ पथके सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सदर टोळीतील आणखीन एक साथीदार  समीर शमशुद्दीन शेख, वय ३० वर्ष, रा. मोमीनपुरा खाजा नगर, बीड याला ५ लाख ७२ हजार रुपयाच्या विविध प्रकारचा प्रतिबंधित गुटखा व एक ८ लाख रुपयाची इनोव्हा कारसह ताब्यात घेण्यात आले आहे.
नमूद आरोपींनी लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रात्रीच्या वेळी दुकानाचे शटर तोडून चोरलेला, लपवून ठेवलेला विविध प्रकारचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यामध्ये सिगारेट, तांदूळ, साबण, गायछाप तंबाखू, गोड तेल, काजू, बदाम इत्यादी प्रकारचा किराणामाल एकूण किंमत ४ लाख रुपयेचा किराणामालचा व सिगारेटचा मुद्देमालहस्तगत करण्यात आला आहे. एकंदरीत लातूर जिल्ह्यातील पोलीस ठाणे रेणापूर,चाकूर, वाढवणा, उदगीर शहर, किनगाव येथील प्रत्येकी एक तर अहमदपूर पोलीस ठाण्यामधील चोरीच्या ३ गुन्ह्याची अशा एकूण ९ गुन्ह्याची उकल झाली असून गुन्ह्यात चोरलेला व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण २४ लाख ८० हजार २५० रुपयाचा मुद्देमाल सदरच्या टोळीकडून हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
नमूद टोळीने लातूर जिल्ह्यात तसेच शेजारील जिल्हे बीड, परभणी, कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यातही मालमत्ता चोरीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले असून त्याप्रमाणे पुढील तपास सुरू असून आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत. तसेच या टोळीला पकडण्याच्या कामी प्रयत्न करणा-या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना लवकरच पोलीस प्रशासनाकडून बक्षीस जाहीर केले जाणार आहे. या कामी मदत करणा-या ग्राम सुरक्षा दलांना ही प्रशस्ती पत्र देऊन गौरविले जाणार असल्याचे यावेळी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी सांगीतले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण व स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. सुधाकर बावकर यांची उपस्थिती होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR