मोदी-शाहांचाही ग्रीन सिग्नल; पक्षातील नेत्यांचीच मिळत नव्हती साथ!
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याची चर्चा जोरात रंगली असून दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून वेगवेगळी मते मांडली जात आहेत. मात्र, शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांकडून अजित पवारांची इच्छा ही एकत्र येण्याची होती, असे ठामपणे सांगितले जात आहे. शरद पवारांनीही या वृत्ताला दुजोरा दिला.
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार यांना काका शरद पवार यांच्यापासून सोडून गेल्याचा डाग पुसायचा होता. तसेच बहीण सुप्रिया सुळे यांच्याशी असलेले नाते कायम ठेवायचे होते. त्यातूनच दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचाली गतिमान झाल्याचे सांगण्यात येत होते. परंतु राष्ट्रवादीतील नेत्यांचीच अजित पवारांना मदत मिळत नव्हती, अशी माहिती समोर आली आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला थेट एनडीएसोबत जाता येत होते. त्यामुळे इंडिया आघाडीला मोठा झटका बसला असता. मात्र, कुटुंब एक झाले नसते. त्यामुळे दोन्ही बाजूंनी कुटुंब एक होणे गरजेचे होते. अजित पवार यांना पक्ष चालवताना सध्याच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची फारशी मदत होत नव्हती. पुणे आणि पिंपरी-चिंचवड असो की विधानसभा निवडणूक असो अजित पवार यांच्या पक्षाच्या नेत्यांनी फार मदत केली नव्हती, अशीही विश्वसनीय नेत्यांची माहिती आहे.
दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्यासंदर्भात कधी केव्हा काय चर्चा झाली, यासंदर्भाने महत्त्वाची माहिती समोर आली. नागपूर अधिवेशनात नोव्हेंबर २०२४ नंतर या चर्चेला सुरूवात झाली. जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात अनेक बैठका झाल्या. देवेंद्र फडणवीस यांना सांगण्यात आले तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी मला वर बोलावे लागेल, असेही सांगितले होते. त्यानंतर ५ ऑक्टोबर २०२५ रोजी अजित पवार यांनी अहिल्यानगर येथे अमित शाह यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून सांगतो असे सांगितले तर १४ नोव्हेंबर २०२५ रोजी पंतप्रधानांकडून ग्रीन सिंग्नल मिळाला आणि मुख्यमंत्र्यांशी बोलून घ्या, असे म्हटले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी मी वरती बोलतो आणि सांगतो, असे सांगितले होते, अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनीही ग्रीन सिग्नल दिला. मात्र, महानगरपालिका निवडणुकीनंतर जाहीर करा, असे सांगितले. त्यानंतर १६ जानेवारीला बैठक झाली. अजित पवार, सुनिल तटकरे आणि सुप्रिया सुळे यांची प्रेम कोर्टला बैठक झाली. १७ जानेवारी २०२६ रोजी शरद पवार यांना सांगण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुका घड्याळावर लढवण्याचा निर्णय झाला. या निवडणुकीच्या प्रचाराची धुरा अजित पवार यांनी अमोल कोल्हेंवर सोपविली होती, अशा संपूर्ण घटनाक्रमाची माहिती सूत्रांनी दिली.

