मुंबई : प्रतिनिधी
ज्या महिलांना पती किंवा वडील नाहीत अशा महिलांना अजूनही केवायसी करता येणार असल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, अंगणवाडी सेविकांकडे जमा करण्यात आलेल्या कागदपत्रांच्या आधारे ही केवायसीची प्रक्रिया सुरू आहे. जिल्हा महिला बालविकास अधिकारी हे त्यांच्या लॉगईनवरून केवायसी करत आहेत. त्यामुळे आता आशा लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. अजूनही राज्यातील तब्बल ४५ लाख महिलांची केवायसी बाकी आहे.
राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे, या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये दिले जातात. दरम्यान राज्यात सध्या निवडणुकीचे वातावरण आहे, आधी नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका झाल्या, त्यानंतर आता लवकरच महापालिका निवडणुकांसाठी मतदान होणार आहे, दरम्यान या निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे लाभार्थी महिलांना मिळणा-या सन्मान निधीला ब्रेक लागला होता. मध्यंतरी सरकारने नोव्हेंबर महिन्याचे दीड हजार रुपये लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केले. तर आता नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे देखील येत्या तीन ते चार दिवसांमध्ये जमा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे हे मकर संक्रांतीपूर्वी मिळणार आहेत, परंतु १५ जानेवारी रोजी राज्यात महापालिका निवडणुकीसाठी मतदान असल्याने काँग्रेसकडून यावर आक्षेप घेण्यात आला होता. काँग्रेसने या संदर्भात निवडणूक आयोगाला पत्र देखील पाठवले आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीपूर्वी तीन हजार रुपये मिळणार का हे पहावे लागणार आहे.
या सर्व घडामोडी सुरू असतानाच आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने केवायसी सक्तीची केली होती, ज्या महिलांनी केवायसी केली नाही त्यांचे नाव या योजनेतून वगळण्यात येणार आहे. या योजनेसाठी केवायसी करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२५ होती, त्यानंतर आता ही साईट देखील बंद झाली आहे. परंतु तरी देखील काही महिलांना अजूनही या योजनेसाठी केवायसी करता येणार आहे.
भाजप महायुतीने डिसेंबर आणि जानेवारीचा, असा एकूण तीन हजार रुपयांचा लाभ एकत्रित देण्याचे ठरवले आहे. माहितीनुसार काही जिल्ह्यांत निधीचे वितरण देखील झाले आहे. यावर काँग्रेसने राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहून लक्ष वेधले आहे. ही एक प्रकारची सामूहिक सरकारी लाच आहे. आदर्श आचारसंहितेचा भंग या सरकारी कृतीने होत आहे. लाडकी बहीण योजनेला आमचा विरोध नाही. या योजनेचे पैसे निवडणूक संपल्यानंतरच वितरीत करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे काँग्रेसने केली आहे.
निवडणूक आयोगाकडून दखल
दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने या पत्राची दखल घेतली असून, त्यावर उत्तर दिले आहे. काँग्रेसच्या तक्रारीवर विचार करू, असे आयोगाने उत्तर दिले आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग नेमका काय निर्णय देणार याकडे लक्ष लागले आहे. परंतु काही जिल्ह्यांत लाभाचा निधी वितरीत झाल्याचे समोर येत आहे.
मंत्री बावनकुळे यांचा संताप
काँग्रेसच्या या पत्रावर भाजपचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींबद्दलचा द्वेष काँग्रेसमध्ये ठासून भरला आहे. तो वरचेवर उफाळून येतो. आमच्या माता-भगिनींच्या चेह-यावरचा आनंद काँग्रेसला व काँग्रेस नेत्यांना बघवत नाही, असा टोला लगावला आहे. नात्यात विष कालवणारी ही काँग्रेसची जहरी विचारधारा, आता सर्वांसमोर आली असल्याचेही बावनकुळे यांनी म्हटले.
ठाकूर यांचे जोरदार प्रत्युत्तर
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या टीकेवर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या, चंद्रशेखर बावनकुळे यांना कमी लिहिता- वाचता येत असावे. पत्रामध्ये असे लिहिले आहे की, लाडक्या बहिणींचे पैसे मतदान झाल्यानंतर द्या, तसेही लाडक्या बहिणीचे पैसे हे तीन महिन्यांनंतर उशिरा देतात. महिलांना जेव्हा पैसे पाहिजे तेव्हा तुम्ही देत नाही आणि आता निवडणुकीच्या समोर तुम्ही पैसे देत आहात, हे बरोबर नाही. कोणती विचारधारा जहर पसरवत आहे, हे सर्व जग बघत आहे. पूर्ण युवा पिढी भाजपवाल्यांनी खराब करून टाकली, असा टोला यशोमती ठाकूर यांनी लगावला.

