लातूर : प्रतिनिधी
माहेरहून सोने व कपडे खरेदी करण्यासाठी पैसे घेऊन ये, म्हणून स्वत:च्या लहान मुलासमोर पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिचा खून केल्याच्या प्रकरणात लातूर येथील सत्र न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मयत जयाबाई गजानन चक्रे, (रा बौद्ध नगर, लातूर) हीस तिचा पती गजानन एकनाथ चक्रे व दीर संतोष एकनाथ चक्रे हे तिला विवाहापासून तू माहेरहून घर चालविण्यासाठी व घर बांधणीसाठी पैसे घेऊन ये, म्हणून नेहमी मारहाण करुन त्रास देत होते. दीर संतोष चके्र याच्या मेव्हण्याला मुलगा झाला आहे त्याला कपडे व सोने खरेदी करण्यासाठी तुझ्या माहेरहून पैसे आणत नाहीस याचा राग धरुन दि. १३ जानेवारी २०२१ रोजी राहते घरी गजानन चक्रे व संतोष चक्रे यांनी मयत जयाबाई हिचे अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले होते.
त्यात जयाबाई ही ४० टक्के भाजल्याने तिचेवर सरकारी दवाखाना लातूर येथे उपचार चालू असताना दिनांक १२ फेब्रुवारी २०२१ रोजी ती मयत झाली होती. सदर प्रकरणी मयत जयाबाई हिचा भाऊ रवी सोपानराव मुळे यांचे तक्रारीवरून आरोपी विरुद्ध विवेकानंद पोलीस स्टेशन लातूर येथे गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणी तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दयानंद पाटील यांनी प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक करून प्रत्यक्षदर्शी व माहितगार साक्षीदार यांचे जबाब नोंदवून आरोपी विरुद्ध सबळ पुरावा मिळाल्याने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सदर प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र.१, आर.बी.रोटे यांचे समोर झाली. सदर प्रकरणात एकूण ९ साक्षीदारांच्या जबानी नोंदविण्यात आल्या. सदरचा खून हा मयताचा लहान मुलगा याचे समोर झाल्याने त्याने तशी साक्ष न्यायालयात दिली. मुलाची जबानी ग्रा धरून समर्थनीय पुरावा आल्याने आरोपी गजानन एकनाथ चक्रे यास जन्मठेप व १००० रु. दंड, तर खाली २ वर्ष शिक्षा व ५०० रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली.