19.3 C
Latur
Friday, January 17, 2025
Homeराष्ट्रीयपत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही! उच्च न्यायालयाचे निरीक्षण

पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही! उच्च न्यायालयाचे निरीक्षण

 

अलाहाबाद : वृत्तसंस्था
नवरा-बायकोच्या घटस्फोटासंदर्भातील एका खटल्यात अलाहाबाद उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं आहे. पत्नीची दारू पिण्याची सवय ही पतीविरुद्ध क्रूरता नाही, असे न्यायालयाने म्हटलं आहे. जोपर्यंत नशेत पत्नीकडून पतीसोबत अभद्र किंवा अनुचित प्रकार घडत नाही, तोपर्यंत ती क्रुरता ठरत नाही, असे न्यायालयाने मत नोंदवलं आहे.

दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून हे पती-पत्नी विभक्त राहत होते, त्याच अनुषंगाने न्यायालयाने दोघांच्या घटस्फोटाला कायदेशीर संमती दिली. पतीने माझी पत्नी दारू पिते आणि मला न सांगता रात्री आपल्या मित्रांसमवेत वेळ घालवते, असा आरोप करत पतीने पत्नीविरुद्ध घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्यावरील सुनावणीवेळी न्यायलयाने दारु पिणे ही क्रूरता ठरत नाही, असे न्यायालयाने म्हटले.

संबंधित खटल्यात पत्नी दारु पिऊन पतीसोबत गैरव्यवहार करते किंवा अभद्रपणे वागते असे कुठेही सिद्ध झाले नाही. पतीकडून असे कुठलेही पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले नाहीत. त्यामुळे, पत्नीकडून क्रूर व्यवहार केला जात असल्याचे सिद्ध झाले नाही. याचिकाकर्ता पतीने पत्नीकडून क्रूर वागणूक मिळत असून सातत्याने मला सोडून जात असल्याचे कारण देत घटस्फोटासाठी अर्ज केला होता.

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश विवेक चौधरी आणि न्या. ओमप्रकाश शुक्ला यांच्या खंडपीठात याप्रकरणी सुनावणी झाली. त्यामध्ये, क्रूरता आणि परित्याग दोन्ही गोष्टी एकमेकांपासून विभिन्न आहेत. तसेच, न्यायालयात ही बाब कुठेही सिद्ध झाली नाही की, दारु पिणे ही क्रूरता आहे किंवा दारु पिल्याच्या कारणास्तव जन्मलेल्या मुलांमध्ये कुठलेही शारीरिक व्यंग आहे, किंवा प्रकृती स्वास्थ ठीक नाही. याशिवाय पत्नीला आलेले फोन कॉल्स हे पुरुष मित्राचेच आहेत, याचे कुठेही रेकॉर्ड नाही किंवा ज्यामुळे पतीसोबत क्रूरपणाचे वर्तन झाल्याचे सिद्ध होते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. दरम्यान, लग्नानंतर एका वर्षातच पती-पत्नी विभक्त राहत होते. हिंदू विवाह कायद्यानुसार हे परित्यागसारखेच आहे. या खटल्यात पत्नीचा कुठलाही सहभाग नाही, त्यावरुन पत्नीची पुन्हा पतीसोबत राहण्याची इच्छा नाही असेच दिसते, यावरुन न्यायालयाने दोघांचा घटस्फोट मंजूर केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR