पुणे : प्रतिनिधी
पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या मतदार यादी नव्याने तयार करण्याच्या कार्यक्रमाअंतर्गत ६ नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणीची संधी उपलब्ध असून सर्व पात्र पदवीधर व शिक्षकांनी नोंदणी करावी, असे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सांगितले.
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी १ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारित नव्याने मतदार याद्या (डी – नोव्हो) तयार करण्याच्या कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणी सुरू आहे. असे नमूद करून ते म्हणाले, मतदार नोंदणीसाठी ऑफलाईनसोबतच भारत निवडणूक आयोगाकडूनhttps://mahaelection.gov.in/Citizen/Login या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मतदार नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सन २०२६ मध्ये पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाकरिता होणा-या निवडणुकीसाठी पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी हे सहायक मतदार नोंदणी अधिकारी आहेत. तसेच प्रत्येक विधानसभा मतदारसंघांचे मतदार नोंदणी अधिकारी हे त्यांच्या कार्यक्षेत्रापुरते मतदार नोंदणीचे काम करीत आहेत.

