22 C
Latur
Friday, December 20, 2024
Homeपरभणीपरभणीतील ३ पोलिस अधिकारी सक्तीच्या रजेवर

परभणीतील ३ पोलिस अधिकारी सक्तीच्या रजेवर

राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्षांचे निर्देश
परभणी : प्रतिनिधी
परभणी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील संविधान प्रतिकृतीचा अवमान झाल्याच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या बंददरम्यान हिंसक वळण लागले. याला पोलिस यंत्रणाच जबाबदार असून कायदा व सुव्यवस्था राखण्यात दिरंगाई केल्या प्रकरणी ३ पोलिस अधिका-यांना चौकशी होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे निर्देश राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सचिव ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी दिले.

राज्याच्या अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ऍड. मेश्राम हे मंगळवारी परभणीत दाखल झाले. त्यांनी परभणी येथे घडलेल्या घटनेप्रकरणी आढावा घेतला. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ऍड. मेश्राम म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील संविधान प्रतिकृतीचा अवमान मनोरूग्णाने केला. या पार्श्वभ्ूमीवर रात्रीच मोठा जमाव जमा झाला होता. दुस-या दिवशी बंददरम्यान दगडफेक व जाळपोळीची घटना घडली. परंतु कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलिस प्रशासन अपयशी ठरले तर प्रशासनाने मात्र संवेदनशील व संयमीपणा दाखवल्याचे ते म्हणाले. दरम्यान, व्यापा-यांच्या नुकसानीचे पंचनामे करून ते शासनाकडे व आयोगाकडे सादर करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

आंदोलन चिघळण्याच्या
घटनेची चौकशी व्हावी
या घटनेत कोणत्या शक्ती सहभागी झाल्या, ज्यामुळे आंदोलन चिघळले, याची चौकशी होणे गरजेचे असून सर्वांनी सामाजिक दरी कमी करण्याचा प्रयत्न करावा असे ते म्हणाले. परभणीतील कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलिस अपयशी ठरले असून ३ पोलिस अधिका-यांना चौकशी होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे आदींची उपस्थिती होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR