परभणी/प्रतिनिधी
स्व.अॅड.शेषराव धोंडजी भरोसे यांच्या स्मृतीनिमित्त पाचव्यांदा संजीवनी मित्र मंडळाच्या वतीने येथील संत तुकाराम महाविद्यालयाच्या मैदानावर १४ ते १७ फेब्रुवारी दरम्यान राज्यस्तरीय कृषी संजीवनी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शिवसेना नेते तथा संयोजक आनंद भरोसे यांनी दिली.
या महोत्सवाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या उद्घाटन समारंभास पालकमंत्री मेघना बोर्डीकर, आ. रत्नाकर गुट्टे, आ. राजेश विटेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती संयोजक भरोसे यांनी शुक्रवार, दि.२४ रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बाळासाहेब पानपट्टे, सचिन पाटील यांची उपस्थिती होती.
कृषी संजीवनी महोत्सवात निरनिराळे ६ दालन उभारण्यात येणार आहेत. हे दालन अत्याधुनिक डोम पद्धतीने भव्य जम्बो मंडप उभारले जाणार आहेत. तसेच प्री – फॅब्रिकेटेड स्टॉल्स उभारले जाणार आहेत. या प्रदर्शनात २००हून अधिक कृषी उत्पादनाचे स्टॉल सहभागी होणार आहेत. या मंडपामध्ये कॉन्फरन्स हॉल देखील उभारण्यात येत असून त्यामध्ये शेतकरी बांधवाकरिता शेती विषयक चर्चासत्र व परिसंवाद, जिल्ह्यातील प्रगतशील शेतक-यांचा गौरव, सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
कृषी प्रदर्शनात आधुनिक तंत्रज्ञान, बी – बियाणे, सेंद्रीय शेती, पद्धती, गांडूळ खत निर्मिती, पशुखाद्य, ट्रॅक्टर, आधुनिक शेती अवजारे, रासायनिक खते, कृषी मार्गदर्शक पुस्तके, ठिंबक सिंचन, सोलार उत्पादने, महिला बचत गटांची उत्पादने, गृहोपयोगी वस्तू, धान्य महोत्सव असे स्टॉल्स लागणार आहेत. हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामुल्य असून जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी कृषी प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन संयोजक भरोसे व संजीवनी मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
शेतकरी, नागरीकांसाठी हेलीकॉप्टर सैरचे आयोजन
दरम्यान या महोत्सवात ६ किलो वजनाचा कोंबडा, सर्वात बुटकी म्हैस, ३० किलोचा चिनी बोकड हे या प्रदर्शनाचे आकर्षण ठरणार आहे. माफक दरात शेतकरी व नागरिकांसाठी हेलिकॉप्टरची ७ मिनिटांची सैर आयोजित केली आहे, अशीही माहिती भरोसे यांनी दिली.