परभणी : परभणी जिल्ह्यात २ हजार ९०० घुसखोरांनी खोट्या कागदपत्राद्वारे भारतीय नागरीकत्व मिळवण्याचा प्रयत्न केला असून त्यांच्याविरूध्द गुन्हा नोंद करावा, अशी मागणी भाजपाचे माजी खा. किरीट सोमय्या यांनी केली होती. यानंतर तहसीलदार संदीप राजापुरे यांनी तक्रार दिल्यानंतर ४ घुसखोरांविरूध्द नवा मोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
परभणी जिल्ह्यात बनावट जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याचे प्रकरण गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. भाजपाचे माजी खा. सोमय्या यांनी दि.२८ फेब्रुवारी रोजी दुस-यांदा परभणीत येऊन पोलिसांशी संवाद साधला. तपासाशी संबंधीत आणखी माहिती त्यांच्याकडे सुर्पूद केली. शहरातील नवा मोंढा पोलिस ठाणे गाठून बोगस कागदपत्रांशी संबंधीत काही कागदपत्रे अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे, पोलिस उपअधीक्षक डंबाळे यांच्याकडे दिली.
त्यानंतर सोमय्या यांनी तहसीलदार राजापुरे यांना देखील घुसखोरांचे कागदपत्रे सादर करून संबंधितांविरूध्द गुन्हा नोंद करण्याची मागणी केली होती. तहसीलदार राजापुरे यांनी काही कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर शनिवार, दि.१ मार्च रोजी नवा मोंढा पोलिस स्टेशन येथे जावून स्वत: तक्रार दाखल केली. या तक्रारीत त्यांनी तहसील कार्यालयास चुकीची बनावट कागदपत्रे व कागदपत्रांमध्ये खाडाखोड करून त्याच्या छायांकीत प्रती भारतीय नागरीकत्व मिळवण्याच्या दृष्टीने सादर केल्याचे म्हटले आहे.
समरीन बेगम इकबाल कुरेशी या महिलेच्या कागदपत्राची पडताळणी केली असता तिचे आधारकार्ड गुजरात राज्यातील दिसून आले. तर सुरेय्या बेगम शेख गौस या महिलेचे आधारकार्ड तेलंगणा राज्यातील आहे. अतिया बेगम कासीम साब या महिलेने इंदिरा गांधी गर्ल्स उर्दू हायस्कूल परभणी या शाळेची टिसी जन्म प्रमाणपत्राचा पुरावा म्हणून सादर केली आहे. परंतू कागदपत्रात खाडाखोड आणि टिसीमध्ये हस्ताक्षरात बदल असल्याचे निदर्शनास आल्यानंतर हे कागदपत्रे बनावट असल्याचे स्पष्ट झाले. वरील ३ घुसखोरांसह अन्य एका अल्पवयीन मुली विरूध्दही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.