नाशिकहून परभणीत आलेल्या व्यक्तीचा चक्कर आल्याने मृत्यू
परभणी : प्रतिनिधी
नाशिक येथे कामासाठी गेलेले ३७ वर्षीय शिवाजी बबन कांबळे परभणीत भावाकडे आले असता दिवसभर उन्हात फिरून चक्कर आल्याने उष्माघात होवून मृत्यू झाल्याच्या चर्चेने परभणी शहरात खळबळ उडाली. दरम्यान, त्यांच्या भावाने दिलेल्या तक्रारीनंतर नानलपेठ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
मूळचे परभणीचे शिवाजी बबन कांबळे हे नाशिक येथील पिंगळे मळा येथे वास्तव्यास आहेत. २३ एप्रिल रोजी ते परभणी शहरातील नांदखेडा रोड भागात वास्तव्यास असलेले त्यांचे बंधू महादेव बबन कांबळे यांच्याकडे आले होते. दिवसभर बाहेर फिरल्यावर त्यांना शनिवारी अस्वस्थ वाटू लागले. त्यांना चक्कर आली. ते एका खड्ड्यात पडलेल्या अवस्थेत सापडले. यावेळी त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान दिवसभर उन्हात फिरल्याने त्यांना चक्कर आली आणि उष्माघाताने त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती त्यांचे बंधू महादेव कांबळे यांनी नानलपेठ पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. या प्रकरणाची संपूर्ण शहरात चर्चा सुरू आहे. परंतु प्रशासनाकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. तसेच उष्माघाताने मृत्यू झाल्याच्या घटनेला दुजोरा दिलेला नाही.
परभणीचा पारा वाढला
परभणीचे तापमान मागच्या आठवडाभरापासून ४० पार गेले आहे. दोन दिवसांपासून तापमान ४२ अंशावर गेले होते. त्यानंतर रविवारी परभणी शहर परिसरातील तापमान ४३.७ अंश सेल्सिअस नोंदले गेले. त्यामुळे प्रचंड उकाडा जाणवत आहे. यावर प्रशासनाने काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे
उष्माघातापासून
स्वत:चा बचाव करा
राज्याच्या अनेक भागात तापमानाचा पारा ४० अंशाच्या पुढे गेला आहे. अनेक ठिकाणी उष्णतेची लाट नोंदवण्यात आली आहे. या वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. शहरात वाढत्या तापमानाची आणि उष्णतेच्या लाटेची शक्यता लक्षात घेता आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
















