परभणी : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन व भारतीय गुणवत्ता परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधार मूल्यमापन मोहिमेत परभणी जिल्ह्यातील राज्य वस्तू व सेवा कर (जीएसटी) कार्यालयाने राज्यस्तरावर दुसरा क्रमांक पटकावून लक्षणीय यश संपादन केले आहे. या यशाबद्दल सोमवार, दि. २६ रोजी कर सल्लागार असोसिएशन, सीपीई चॅप्टर परभणीच्या वतीने सहायक राज्यकर आयुक्त धनंजय देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.
या मूल्यमापनामध्ये कार्यालयीन कार्यक्षमता, पारदर्शकता, नागरिकांशी सुसंवाद, वेळेवर सेवा प्रदान, तसेच कार्यालयीन स्वच्छता आणि परिसर व्यवस्थापन अशा विविध निकषांचा समावेश होता. क्यूसीआयतर्फे करण्यात आलेल्या या सखोल मूल्यांकनात परभणी जीएसटी कार्यालयाने उत्कृष्ट कामगिरी बजावत राज्यातील इतर कार्यालयांना मागे टाकले. सहायक राज्यकर आयुक्त देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्रितपणे कार्यपद्धतीत गुणात्मक बदल घडवून आणले.
या यशामागे अप्पर राज्यकर आयुक्त बनसोडे, छत्रपती संभाजीनगर येथील सहआयुक्त अभिजित राऊत (आयएएस), जालना विभागाचे सहआयुक्त श्रीकांत गांगुर्डे, उपायुक्त मिसाळ आणि उपायुक्त योगेश शिंदे यांचे मार्गदर्शन अत्यंत मोलाचे ठरले.
हे यश केवळ परभणी जिल्ह्यासाठी नव्हे, तर संपूर्ण विभागासाठी गौरवास्पद आहे. आगामी काळात हीच गुणवत्ता टिकवून ठेवत आणखी प्रगती साधण्याचा निर्धार परभणी वस्तू व सेवाकर कार्यालयाने व्यक्त केला आहे. कर सल्लागार असोसिएशन, सी. पी. ई. चॅप्टर परभणीच्या वतीने करण्यात आलेल्या सत्कार प्रसंगी राजकुमार भांबरे, संतोष इंगळे, रोहित मंत्री, गोविंद भंडारी, ऍड. पितळे, भारत क-हाळे, प्रशांत काबरा, शाम धूत, कुशल गंगवाल, निलेश शर्मा आदी कर सल्लागार आणि सीए उपस्थित होते.