बीड : प्रतिनिधी
परळीत एका वर्षात १०९ मृतदेह सापडल्याचे सांगत यातील १०६ प्रकरणांची साधी नीट चौकशीही होत नसल्याचे अंजली दमानिया यांनी सांगितले.
परळीत सध्या मोठी दहशत असून इथल्या पोलीस यंत्रणेवर इथल्या आमदारांचा आणि वाल्मीक कराडांचा कंट्रोल आहे. हा कंट्रोल सुटण्यासाठी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या. परळी म्हणजे बिहारचा बाप झाला असून लाडकी बहीण योजनेत वाल्मीक कराडांना अध्यक्ष बनवण्याची शिफारस खुद्द मंत्री धनंजय मुंडेंनी केल्याचे कळणे याशिवाय धक्कादायक काहीच नसल्याचेही त्या म्हणाल्या.
वाल्मीक कराड यांच्यावर २२ गंभीर आणि इतर २३ असे एकूण ४५ गुन्हे दाखल आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष बनविण्यासाठी धनंजय मुंडे यांनी वाल्मीक कराड यांची शिफारस केल्याची माहिती समोर आल्यावर अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला. धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड या दोघांची कामे एका व्यक्तीप्रमाणे होत आहेत. म्हणूनच वाल्मीक कराड यांची चौकशी योग्य रीतीने व्हावी यासाठी धनंजय मुंडे यांचा राजीनामा आवश्यक आहे, असे त्या म्हणाल्या.
परळीतील फक्त तिघांच्या प्रकरणांची चौकशी व्यवस्थित होत असल्याचे दिसते, तर उर्वरित १०६ प्रकरणांची चौकशी योग्य प्रकारे होत नसल्याचा आरोप आहे.अंजली दमानिया यांनी सांगितले की, पोलीस यंत्रणेवर तिथल्या आमदारांचा आणि वाल्मीक कराड यांचा मोठा प्रभाव आहे, जो काढून टाकला पाहिजे. त्यामुळेच मी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे.
वाल्मिक कराडवर १५ गुन्हे
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येशी संबंधित पवनचक्की कंपनी खंडणीप्रकरणी गुन्हा नोंद झालेल्या वाल्मिक कराडवर या आधीही अनेक गुन्हे नोंद असल्याचे समोर आले आहे. वाल्मिक कराडवर या आधी १५ गुन्हे दाखल आहे. यापैकी ८ गुन्ह्यात त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. खंडणीसह इतर ४ प्रकरणे ही न्यायप्रविष्ट आहेत.