बीड : परळी येथील वैद्यनाथ मंदिराच्या परिसरात कामगारांनी रात्रीच्या सुमारास चूल मांडून ऑमलेट, मांस शिजवले असल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे आणि भाजप पदाधिकारी योगेश पांडकर यांनी हे प्रकरण लावून धरले आणि श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे सदस्य राजेश देशमुख यांनी याबाबत माहिती दिली आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे काम हे नगर परिषद करीत असून या कामावर नियंत्रण नगर परिषदेचे असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान ऑमलेट, मांस शिजविणा-या कामगारांना आता कामावरून काढून टाकल्याची माहिती समोर आली आहे. शिवाय वैद्यनाथ मंदिर परिसरात ऑमलेट, मांस शिजवलेल्या ठिकाणाचे गोमूत्र शिंपडून शुद्धीकरणही करण्यात आले आहे. यावेळी परिसरात काही काळ गोंधळ झाल्याचे बघायला मिळाले.
भाविकांकडून गोमूत्र टाकून परिसराचे शुद्धीकरण
पुढे आलेल्या माहितीनुसार, वैद्यनाथ मंदिर परिसरात तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत होत असलेल्या नवीन दर्शन मंडपाच्या ठिकाणी कामगारांनी ऑमलेट आणि मांस शिजवल्याचा प्रकार समोर आला होता. आता याच जागेचे भाविकांकडून गोमूत्र टाकून शुद्धीकरण करण्यात आले आहे. शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे आणि भाजप पदाधिकारी योगेश पांडकर यांच्यासह भाविकांकडून हे शुद्धीकरण करण्यात आले आहे.