16.8 C
Latur
Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्रपरवानगी घेऊनच महिलांच्या त्या फोटोचा वापर

परवानगी घेऊनच महिलांच्या त्या फोटोचा वापर

राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण’ जाहिरातीत वापरलेल्या फोटोवरून वाद

पुणे : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विरोधात पुणे पोलिसांत तक्रार देण्यात आली. राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण’ जाहिरातीत वापरलेल्या फोटोवरून हा वाद निर्माण झाला होता.
सिद्धार्थ शिरोळे यांनी छापलेल्या फ्लेक्सवर दोन महिलांचे फोटो छापण्यात आले आहेत. आपली परवानगी न घेता हे फोटो छापल्याचे म्हणत या महिलांनी पुणे पोलिसांत धाव घेतली होती. पुण्याचे सह पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांच्याकडे त्यांनी तक्रार अर्ज दिला होता. यावर आता सिद्धार्थ शिरोळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ज्या फोटोग्राफरने हे फोटो काढले होते त्याची परवानगी घेऊनच हे फोटो वापरले असल्याचे त्यांनी सांगितले.

सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, मुख्यमंत्री ‘लाडकी बहीण’ योजनेचा प्रसार व्हावा आणि महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळावेत या हेतूने ते फ्लेक्स लावण्यात आले होते. या फ्लेक्सवर ज्या महिलांचे फोटो वापरण्यात आले होते त्याची आधीच परवानगी घेतली होती. जाहिरात एजन्सीच्या माध्यमातून, परवानगी घेऊन आणि रीतसर पैसे भरूनच त्या फोटोचा वापर करण्यात आला होता. २०१६ साली हा फोटो काढण्यात आला होता. ज्या छायाचित्रकाराने हा फोटो काढला त्याची परवानगी घेऊनच जाहिरात एजन्सीच्या मार्फत हा फोटो वापरण्यात आला आहे.

जाहिरातीत हा फोटो वापरण्यामागे ही जाहिरात लोकांपर्यंत पोहोचवणे हाच उद्देश आहे. तरीसुद्धा हा फोटो वापरल्याने त्या महिलांना वेदना झाली असतील तर दिलगिरी व्यक्त करतो.

दरम्यान सिद्धार्थ शिरोळे यांच्या नावाने प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीत ज्या महिलांचे फोटो वापरण्यात आले होते त्यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. आपल्याला न विचारता फोटो वापरल्यामुळे कुटुंबात वाद-विवाद आणि गैरसमज निर्माण झाल्याचे त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR