सांगली : दवाखान्यात काम करणा-या परिचारिकेवर बलात्कार केल्याप्रकरणी मिरजेतील डॉ. सुयोग ऊर्फ बॉबी अरवट्टगी यास गोव्यात पोलिसांनी अटक केली. डॉ. अरवट्टगी याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
मिरजेतील डॉ. सुयोग ऊर्फ बॉबी अरवट्टगी हे गोव्यात कांकोलीम येथे वैद्यकीय व्यवसाय करतात. एक महिन्यापूर्वी डॉ. सुयोग यांनी त्यांच्या खासगी रुग्णालयात काम करणा-या परिचारिकेस रुग्णाच्या तपासणीच्या बहाण्याने त्यांच्या निवासस्थानी नेले.
यावेळी त्यांनी परिचारिकेवर बलात्कार केल्याची तक्रार आहे. या घटनेनंतर पीडित परिचारिकेने गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याने तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून डॉ. अरवट्टगी यांना अटक केली. तीन दिवस पोलिस कोठडीनंतर न्यायालयाने डॉ. अरवट्टगी यांना १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.