मुंबई :राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रताप सरनाईक यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे आभार मानले आहेत. एसटीला भविष्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम करून एक चांगली दर्जेदार परिवहन सेवा निर्माण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असेही ते म्हणाले. प्रताप सरनाईक हे एसटी महामंडळाचे २६वे अध्यक्ष असणार आहेत.
महाराष्ट्र शासन केंद्रीय अधिनियमान्वये तयार केलेल्या नियम व आदेशानुसार प्रताप सरनाईक यांच्यावर एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. सरनाईक यांच्या आधी मुख्य सचिव संजय सेठी यांची एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदावर निवड करण्यात आली. मात्र, त्यानंतर प्रताप सरनाईक यांच्याकडे फक्त नावापुरतेच परिवहन खाते देण्यात आले आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपला निर्णय मागे घेतला आणि एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी अधिकृतपणे प्रताप सरनाईक यांच्या नावाची घोषणा केली.
प्रताप सरनाईक काय म्हणाले?
महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची लोकवाहिनी असलेल्या एसटीला भविष्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम करून एक चांगली दर्जेदार परिवहन सेवा निर्माण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे प्रताप सरनाईक म्हणाले. तसेच या पदावर नियुक्त करून महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे आभार मानले.
एसटी महामंडळाचा इतिहास
दरम्यान, १९६० साली एसटी महामंडळाची स्थापना झाली. र. गो. सरैय्या हे एसटी महामंडळाचे पहिले अध्यक्ष होते. त्यानंतर त्यानंतर अनेक महत्त्वाच्या व्यक्तींनी एसटी महामंडळाचे अध्यक्षपद भूषविले. २०१४ ते २०१९ मध्ये दिवाकर रावते यांनी एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कारभार सांभाळाला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनिल परब यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानंतर शिंदे सरकारमध्ये एकनाथ शिंदे हेच राज्याचे परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष होते. प्रताप सरनाईक यांच्या आधी फडणवीस यांनी संजय सेठी यांची एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड केली होती.