दहावी आणि बारावीच्या परीक्षा विद्यार्थीजीवनातील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. या परीक्षांवर त्यांचे उज्ज्वल भविष्य अवलंबून असते. विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेल्या अभ्यासाचा कस, कसोटी या परीक्षांतून लागते. कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या कसोटीचा हा क्षण असतो. आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून अत्यंत शांत मनाने परीक्षेला सामोरे जायचे असते. परीक्षा एक आव्हान मानून सकारात्मकतेने त्याला सामोरे जायला हवे. इयत्ता बारावीच्या लेखी परीक्षा ११ फेब्रुवारीपासून सुरू झाल्या आहेत तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. यंदा प्रथमच बारावीची परीक्षा दहा दिवस लवकर सुरू झाली आहे. राज्यभरातून १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी राज्यातील ८१८ केंद्रांवर कर्मचा-यांची अदलाबदल करण्यात आली आहे. यात सर्वाधिक केंद्रे छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळातील आहेत. यंदाच्या परीक्षेत गैरप्रकार घडणा-या केंद्रांची परीक्षा केंद्र मान्यता पुढील वर्षापासून कायमस्वरूपी रद्द करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
दरवर्षी बारावीच्या परीक्षेच्या आधी प्रसारित होणा-या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाचे यंदाही दूरदर्शनवरून प्रसारण झाले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, तुमच्या वेळेवर, जीवनावर प्रभुत्व मिळवा, प्रत्येक क्षण जगा, सकारात्मक गोष्टी शोधा, फुलण्यासाठी स्वत:चे पोषण करा. या कार्यक्रमात विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ३५ विद्यार्थी सहभागी झाले होते. ज्ञान आणि परीक्षा या दोन भिन्न गोष्टी आहेत. परीक्षा हेच सर्वस्व आणि जीवनातील अंतिम गोष्ट आहे असे मानू नये असा सल्ला पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांना दिला. विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासापुरते बंदिस्त करून ठेवू नये, त्यांना त्यांच्या आवडीच्या गोष्टी करण्याची मुभा द्यावी, पुरेशी झोप घेऊ द्यावी असा सल्ला त्यांनी पालकांना दिला. प्रेक्षकांचा गोंगाट सुरू असताना मैदानात एखादा फलंदाज तो तणाव कसा हाताळतो ती एकाग्रता शिकली पाहिजे असे सांगून विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे आणि परीक्षेचा ताण घेऊ नये असे पंतप्रधान म्हणाले.
दहावी आणि बारावीच्या परीक्षेत सामूहिक कॉपी करण्याचे प्रकार ज्या केंद्रावर उघडकीस येतील त्या केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द केली जावी तसेच जे शिक्षक आणि कर्मचारी कॉपी करण्यासाठी मदत करतील त्यांना बडतर्फ करा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडणे ही जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची संयुक्त जबाबदारी राहील. शहरी भागात पोलिस आयुक्त व महानगरपालिका आयुक्त यांची जबाबदारी राहील. त्यानुसार कामकाज करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मंगळवारी बारावीच्या परीक्षेला प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी इंग्रजीच्या पेपरला राज्यात एकूण ४२ कॉपीबहाद्दर आढळले. छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक २६ कॉपीची प्रकरणे सापडली. पुणे विभागात आठ, नाशिक विभागात तीन, नागपूरमध्ये दोन, अमरावतीत दोन तर लातूरमध्ये एक या प्रमाणे गैरमार्गाची प्रकरणे आढळली.
कॉपी करण्याचा प्रकार फार जुन्या काळापासून सुरू आहे. ज्यांना अभ्यास करून पास होणे जमत नसते ते शॉर्टकट शोधत असतात. काही महाभाग तर पेपर कसा फोडता येईल यासाठी प्रयत्नशील असतात. पेपर फुटला की मग तो लाखो रुपयांना विकला जातो. इयत्ता दहावी आणि बारावी या दोन महत्त्वाच्या परीक्षेत सर्वाधिक कॉपी होते. शक्यतो कुणाला नापास करायचे नाही असे शासनाचे धोरण असले तरी त्यात पास होणे ज्यांना जमत नाही ते कॉपीचा आधार घेतात. ग्रामीण भागातील अनेक सेंटर कॉपीसाठी प्रसिद्ध आहेत. अनेकजण असे सेंटर मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतात. ‘बनी तो बनी, नही तो परभणी’अशी परभणीबद्दल ख्याती आहे. कॉपी करताना तंत्रज्ञानाचा वापरही मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. एखाद्या कागदावर अपेक्षित उत्तरे लिहिली जातात.
अत्यंत बारीक अक्षरात हे लिखाण असते. या कॉपीच्या झेरॉक्स काढल्या जातात. त्या काढताना मायक्रो झेरॉक्स काढल्या जातात. या कॉप्या खिशात किंवा अन्य ठिकाणी लपवून नेल्या जातात. काही बहाद्दर बाहेरून, खिडकीतून कॉप्यांचा पुरवठा करतात. यात आता एक नवीन प्रकार आला आहे, तो म्हणजे कानात ब्लूटूथ लावणे. ते कानात घातले की दिसत नाही. कॉपीबहाद्दरने कानात ब्लूटूथ घातला की, बाहेरून त्याला कोणीतरी प्रश्नांची उत्तरे देत असतो. आणि ती उत्तरे कॉपीबहाद्दर आपल्या उत्तरपत्रिकेवर लिहित असतो. परंतु आता या सर्व गोष्टींची गंभीर दखल घेतली जाणार आहे. शासनाने कॉपीचा गुन्हा आणि कायदे अत्यंत कडक केले आहेत.
झेरॉक्स सेंटरवाला जर कॉपी करणा-याला मदत करत असेल तर त्याच्यावरही गुन्हा दाखल केला जाणार आहे. परीक्षा केंद्रात प्रवेश देताना विद्यार्थी कोणत्याही प्रकारचे कॉपी करण्याचे साहित्य जवळ बाळगणार नाही याची खबरदारी घेतली जाणार आहे. संवेदनशील परीक्षा केंद्रावर ड्रोन कॅमे-याद्वारे आणि व्हीडीओ कॅमे-याद्वारे नजर ठेवली जाणार आहे. बारावीच्या परीक्षेत राज्यभरात कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. कॉपीची प्रकरणे घडलेल्या केंद्रावरील पर्यवेक्षक व मुख्याध्यापकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यानंतरही असे प्रकार उघड झाल्यास संबंधित केंद्राची परवानगी रद्द करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
परीक्षा भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी महिनाभरापासून नियोजन करण्यात आले आहे. ‘सद्गुण जोपासना’ हे शिक्षणाचे मर्म आहे तसेच ते शिक्षणाचे, जीवनाचे आणि तत्त्वज्ञानाचेही खरे ध्येय आहे. विद्यार्थ्यांनी वर्षभर जी मेहनत केली त्याचे फळ त्यांना परीक्षेतून मिळणार आहे. ज्यांनी मेहनत केलेली नाही तेच गैरमार्गाकडे धाव घेतात. विद्यार्थ्यांनी परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून खचून जाऊ नये, आयुष्यात तुम्हाला आणखी काही संधी खुणावणार आहेत याची खात्री बाळगा.