मुंबई : प्रतिनिधी
मुंबईतील अनेक रेल्वे प्रकल्पांची कामे प्रगतीपथावर आहेत. राज्यात १३२ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात १ लाख ७३ हजार कोटीचे रेल्वे प्रकल्प उभारले जाणार आहेत. यावर्षी जवळपास २४ हजार कोटी राज्याला मिळाले आहेत. यातून रेल्वे विकासाला चालना मिळणार आहे. यासोबतच राज्यात छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन सुरू केली जाणार आहे. या सर्किट ट्रेनने राज्यातील ऐतिहासिक स्थळांना भेट देता येणार आहे. सर्किट ट्रेनने १० दिवस प्रवास करता येणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासमवेत मुंबई येथे होणा-या वेव्हज समिट २०२५ च्या पार्श्वभूमीवर जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे विविध ऑडिटोरियमची पाहणी केली आणि पूर्वतयारीचा आढावा घेतला. या पाहणीनंतर त्यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. यावेळी महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांबाबत मोठ्या घोषणा केल्या.
महाराष्ट्रात १ लाख ७३ हजार कोटींची कामे सुरू आहेत. यात मुंबईसह इतर परिसरात १७ हजार कोटींची कामे सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. केंद्र सरकार महाराष्ट्रातील १३२ रेल्वे स्टेशनचा विकास होणार आहे. महाराष्ट्रातील सर्वांत महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनचा विकास होत आहे. दरवर्षी २३ ते २५ हजार कोटी रुपये मोदी सरकारच्या काळात आपल्याला मिळत आहेत. नव्या रेल्वे लाईन सुरू आहेत. यासोबतच केंद्र सरकारच्या माध्यमातून लवकरच छत्रपती शिवाजी महाराज सर्किट सुरू होणार आहे. त्यामध्ये अतिशय सुंदर अशी आयकॉनिक रेल्वे टूर असणार आहे. शिवाजी महाराजांचे गडकिल्ले किंवा ऐतिहासिक ठिकाणे आहेत, सांस्कृतिक स्थळे आहेत, त्यांना जोडण्याचे काम रेल्वे विभागाकडून होणार आहे. ही आयकॉनिक रेल्वे टूर १० दिवसांची असणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
विदर्भाचा छत्तीसगड-तेलंगणासोबतचा व्यवहार वाढणार आहे. गोंदिया बल्लारशा रेल्वे लाईनचा दुहेरीकरण याकरता ४८१९ कोटी रुपये केंद्र सरकारने दिलेले आहेत. याचा विदर्भाला मोठा फायदा होणार आहे. गोंदिया अशा ठिकाणी आहे की जिथे मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या दोघांची बॉर्डर आहे आणि पलीकडे बल्लारशापासून तेलंगणा आणि तिकडे आंध्र प्रदेश आपल्याला मिळतो. त्यामुळे अतिशय स्ट्रॅटेजीक अशा प्रकारची ही लाईन आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.