पुणे : प्रतिनिधी
एमआयटी आर्ट, डिझाईन ऍण्ड टेक्नॉलॉजी विद्यापीठ (एमआयटी एडीटी), पुणे यांनी आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. विद्यापीठाने जपानमधील जी-प्लेस कॉर्पोरेशन आणि पुण्यातील क्रिस एअरो सर्व्हिसेस प्रा. लि. यांच्यासोबत एक त्रिपक्षीय सामंजस्य करार केला आहे. या कराराअंतर्गत पर्यावरण अभियांत्रिकी क्षेत्रातील एक नवीन प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
या प्रकल्पाअंतर्गत जी-प्लेसने विकसित केलेली ‘डोमेस्टिक मल्टी-रिसायकलर’ तंत्रज्ञान प्रणाली ज्याला ‘जहकासो’ या नावानेही ओळखले जाते – ती एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या परिसरात पर्यावरणीय परिस्थितीत चाचणीसाठी बसविण्यात येणार आहे.
करार समारंभप्रसंगी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. मंगेश कराड, प्र-कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी, अधिष्ठाता डॉ. सुदर्शन सानप तसेच एसओईएसचे संचालक डॉ. वीरेंद्र शेटे उपस्थित होते. क्रिस एअरो सर्व्हिसेसतर्फे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपाडिया, त्यांच्या पत्नी आणि पुत्र राज कपाडिया यांनी सहभाग घेतला.
शाश्वत भविष्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल
ही केवळ एक तांत्रिक भागीदारी नसून स्वच्छ व शाश्वत भविष्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. आमच्या विद्यार्थ्यांना आता जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानावर काम करण्याची संधी मिळणार आहे.
– प्रा. डॉ. मंगेश कराड, कार्यकारी अध्यक्ष, एमआयटी एडीटी विद्यापीठ, पुणे