24.2 C
Latur
Monday, July 1, 2024
Homeसोलापूरपशुवैद्यकीय रुग्णालय बांधल्यास प्राणी संग्रहालयाची मान्यता सुकर

पशुवैद्यकीय रुग्णालय बांधल्यास प्राणी संग्रहालयाची मान्यता सुकर

सोलापूर: महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाच्या मान्यतेसाठी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या सूचनेनुसार पशुवैद्यकीय रुग्णालय बांधल्यास प्राणी संग्रहालयाची मान्यता परत मिळण्याचा मार्ग सुकर होईल, अशी आशा प्राणीप्रेमींनी व्यक्त केली आहे

प्राणी संग्रहालयाची मान्यता रद्द होण्यामागे पशु वैद्यकीय रुग्णालय व वन्यजीव उपचार केंद्र नसणे हे एक मुख्य कारण व अनेक त्रुटींमधील प्रमुख त्रुटी आहे. सोलापुरातील महात्मा गांधी प्राणी संग्रहालयात वन्यजीव उपचार केंद्र नसणे, पूर्णवेळ संचालक नियुक्ती नसणे, माकडांसाठी पिंजरे उपलब्ध नसणे, प्राणी संग्रहालयासाठी सल्लागार संचालक मंडळाची नियुक्ती न करणे, याबरोबरच प्राणी संग्रहालयाला संरक्षक भिंत नसणे या प्रमुख व मोठ्या पाच त्रुटी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने प्राधान्याने नमूद केल्या होत्या, त्यापैकी प्राणी संग्रहालयासाठी वन्यजीव उपचार केंद्र बांधण्याचा प्रस्तावानंतर केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या पथकाकडून पशुवैद्यकीय रूग्णालय व वन्यजीव उपचार केंद्राचा प्रस्ताव दिला पाहिजे.

त्यानंतर केंद्रीय प्राधिकरण पथकाकडून संबंधित जागेची पाहणी होणे गरजेचे आहे. प्रस्तावित रूग्णालय व उपचार केंद्राच्या जागेस प्राधिकरणाने मान्यता दिल्यानंतरच पशू वैद्यकीय रूग्णालय व उपचार केंद्र बांधावे लागणार आहे. लाखो रुपयांचा निधी खर्च करून केंद्रीयप्राणी संग्रहालयाच्या मार्गदर्शनाशिवाय पशुवैद्यकीय रुग्णालय बांधले आणि जर ती जागा केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या पथकास अयोग्य वाटली, तर पुन्हा नव्याने प्राधिकरण पथक सुचवेल त्या जागेवर पशुवैद्यकीय रुग्णालय व उपचार केंद्र बांधण्याची नामुष्की ओढवू शकते. याशिवाय पशुवैद्यकीय रुग्णालयावर झालेला खर्चदेखील वाया जाऊ शकतो, असे प्राणीप्रेमी म्हणत आहेत.

प्राणी संग्रहालयाची मान्यता परत मिळवण्यासाठी राजकीय पाठपुराव्यासह प्रशासकीय स्तरावरदेखील प्रयत्न होणे गरजेचे आहे. याशिवाय प्राधिकरणाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे व नियमांचे पालन करूनच प्राणी संग्रहालयातील उर्वरित त्रुटींचीदेखील पूर्तता करावी लागणार आहे, तरच प्राणी संग्रहालयाची रद्द झालेली मान्यता पुन्हा मिळेल, त्यानंतरच प्राणिसंग्रहालयात वन्यजीवांचा अभ्यास करणे जिल्ह्यातील प्राणी प्रेमींना शक्य होईल, असे मत प्राणीप्रेमींनी व्यक्त केले आहे.पाच प्रमुख त्रुटींची पूर्तता करतानाही केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन कोणत्या पद्धतीने करावयाचे आहे, हे महापालिका प्रशासनाने जाणून घेणे आवश्यक आहे. राजकीय प्रतिनिधी मान्यतेसाठी पाठपुरावा व निधी उपलब्ध करून देतीलही. मात्र त्यापूर्वी प्राधिकरणाच्या नियमावलीचा अभ्यास व त्यानुसार त्यातील नमूद नियमांचे सूक्ष्म पालन केल्यानंतरच प्रशासकीयस्तरावरून प्राणी संग्रहालयाच्यां मान्यतेचा मार्ग सोपाहोईल, अन्यथा सर्वोच्च न्यायालयात जर का मान्यतेचे प्रकरण गेले तर मात्र सोलापूरच्या प्राणी संग्रहालयाची मान्यता पुन्हा मिळण्याची शक्यता कमी आहे.

सोलापूरात प्राणी संग्रहालय सुरू होणे अत्यंत गरजेचे आहे. केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या नियम पालनासाठी पूर्णवळ संचालक आवश्यक आहे. त्याचबरोबर प्राधिकरणाने घालून दिलेल्या नियमात पशुवैद्यकीय रूग्णालय बांधावे. प्राण्यांसाठी पिंजरे तयार करावेत. प्राण्यांची काळजी घेताना कोणताही हलगर्जीपणा होऊ नये. प्राधिकरणाच्या सुचवलेल्या जागेतच रूग्णालय बांधल्यास प्राणी संग्रहालयाची मान्यता मिळू शकते अशी प्राणीप्रेमींची मागणी आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR