मुंबई : प्रतिनिधी
काश्मीरच्या पहलगाममध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी केलेल्या नृशंस हल्ल्यात २६ लोकांनी जीव गमावला असून त्यामध्ये भारतीयांसह परदेशी पर्यटकांचाही समावेश आहे. धर्म विचारून दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात महाराष्ट्रातील ६ जणांचा मृत्यू झाला असून यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यातील अनेक भागात कडकडीत बंद पाळण्यात आला होता तर काही ठिकाणी शुक्रवारी २५ एप्रिल रोजी बंद पाळण्यात येणार आहे.
दरम्यान पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीच्या तीन नागरिकांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण शहर शोकमग्न झाले आहे. अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी या तीन डोंबिवलीकरांचा काश्मीरमध्ये हकनाक बळी गेला असून त्यांच्यावर काल शोकाकुल वातावरणात अन्त्यसंस्कार करण्यात आले. या हल्ल्याच्या तीव्र निषेधार्थ आज ‘डोंबिवली बंद’ची हाक देण्यात आली आहे.
सर्व पक्ष, व्यापारी, शाळा, आणि नागरिक यामध्ये सहभागी झाले आहेत. सकाळपासून डोंबिवलीतील दुकाने, हॉटेल्स, व्यावसायिक आस्थापना बंद आहेत. शहरातील विविध भागांत निषेधाचे बॅनर लावण्यात आले असून नागरिक, व्यापारी, राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्था मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत
‘अमरावती बंद’चीही हाक
जम्मू-काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या अमरावती शहर बंद व निषेध आंदोलन करण्यात येईल. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व सर्वच हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने बंदचे आवाहन करण्यात आले आहे. अमरावतीच्या राजकमल चौकात हिंदुत्ववादी संघटनांचे उद्या सकाळी दहा वाजता आंदोलन होईल. पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यामुळे राज्यात ठिकठिकाणी निषेधाचे आंदोलन केले जात आहे. उद्या अमरावतीतही निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
मालेगावही राहणार बंद
पहलगाम येथील घटनेच्या निषेधार्थ आज ‘मालेगाव बंद’ची हाक देण्यात आली आहे. विविध सामाजिक संघटनांकडून आंदोलने देखील होणार आहेत. काश्मीरच्या पहलगाम भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी व या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या २६ निरपराध नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज ‘मालेगाव बंद’ची हाक देण्यात आली आहे. बंदमध्ये सहभागी होण्याचे छत्रपती संघटनेकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.