कराची : पाकिस्तानला आपल्याच देशात सुरु झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यात नामुष्कीची वेळ ओढवली. कारण पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. न्यूझीलंडने यावेळी संपूर्ण जगासमोर यजमान पाकिस्तानचे वस्त्रहरण केल्याचे सर्वांना पाहायला मिळाले. न्यूझीलंडने धडाकेबाज फटकेबाजी करत ३२० धावांचा डोंगर उभारला होता. पाकिस्तानचा संघ ३२१ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला. पण त्यांच्या फलंदाजांनी घात केला. फलंदाजांच्या हाराकिरीमुळेच पाकिस्तानला हा सामना गमवावा लागला. न्यूझीलंडने पाकिस्तानला ६० धावांनी पराभूत करत विजयी सलामी दिली.
पाकिस्तानचा संघ ३२१ धावांचा आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला खरा, पण त्यांना न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज विल ओरुकेने एकामागून एक दोन धक्के दिले. त्यामुळे पाकिस्तानची अवस्था ही २ बाद २२ झाली होती. पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानचा भन्नाट झेल यावेळी न्यूझीलंडच्या ग्लेन फिलीपने पकडला आणि सर्वांची मने जिंकली. त्यानंतर पाकिस्तानला एकामागून एक धक्के बसत गेले. पण बाबर आझम मात्र एकटा खिंड लढवत होता.
बाबरला कोणाचीही चांगली साथ मिळाली नाही. पण बाबरने दमदार फलंदाजी करत आपले अर्धशतक झळकावले आणि संघाचे आव्हान कायम ठेवण्याचा प्रयत्न केला होता. पण बाबरचा हा प्रयत्न अपयशी ठरला आणि पाकिस्तानला पहिल्याच सामन्यात मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. कारण बाबर आझम ६४ धावांवर बाद झाला आणि पाकिस्तानला पहिला सामना गमवावा लागला.