22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeलातूरपाऊस पडताच मनपा अधिकारी, कर्मचा-यांची उडाली धांदल 

पाऊस पडताच मनपा अधिकारी, कर्मचा-यांची उडाली धांदल 

लातूर : प्रतिनिधी
शहरात गुरुवार दि. ६ जून रोजी झालेल्या जोरदार पावसानंतर विविध भागात तुंबलेल्या पाण्याला रस्ता करुन देत शहर स्वच्छतेसाठी लातूर शहर महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी रात्री उशिरापर्यंत राबले. शहरात ज्या ठिकाणी पाणी साठले होते तो संपूर्ण परिसर स्वच्छ केल्यानंतरच हे अधिकारी व कर्मचारी आपापल्या घरी पोहोचले.
गुरुवारी सायंकाळी शहरात जोरदार पाऊस झाला. यामुळे शहरातील कांही सखल भागात पावसाचे पाणी साठले. अचानक झालेल्या मोठ्या पावसामुळे पाण्याचा लवकर निचरा झाला नाही. शहरातील सरस्वती कॉलनी, सौभाग्यनगर, बरकतनगर, चाणक्य सोसायटी, उस्मानपुरा, नाना-नानी पार्क, नवविकसित एसटी हाऊसिंग सोसायटी, केशवनगर, इस्लामपुरा, डी मार्ट, मंत्रीनगर, देशमुखनगर, रेणापूर नाका, कन्हेरी, जुने जिल्हाधिकारी कार्यालय, बांधकाम भवन या भागातील नाले तुंबले होते. त्यामुळे सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते.
ही बाब लक्षात आल्यानंतर मनपा आयुक्त्त बाबासाहेब मनोहरे यांनी या परिसरातची तात्काळ स्वच्छता करुन साठलेल्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार मनपा अतिरिक्त आयुक्त्त शुभम क्यातमवार, सहाय्यक आयुक्त मंजुषा गुरमे, स्वच्छता विभाग प्रमुख रमाकांत पिडगे, अग्निश्मन अधिकारी सुभाष कदम, क्षेत्रीय अधिकारी, स्वच्छता निरीक्षक यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून कामकाजाला गती दिली. कर्मचा-यांनी या परिसरातील नाल्यांमध्ये अडकलेला कचरा काढून पाण्याला वाट मोकळी करुन दिली. अनेक ठिकाणी वा-यामुळे झाडे पडली होती. तीदेखील तात्काळ उचलण्यात आली.
नाल्यांमधून काढलेला कचरा लगेचच उचलून घेण्यात आला. यामुळे साठलेल्या पाण्याचा लगोलग निचरा झालापावसाळ्याच्या काळात शहरात कुठेही पाणी साठू नये आणि नागरिकांना त्रास होऊ नये याची खबरदारी मनपाकडून घेतली जात आहे. मनपाने शहरातील लहान-मोठ्या नाल्यांची स्वच्छताही केली आहे. गुरुवारी झालेल्या पावसानंतरही मनपा अधिकारी व कर्मचा-यांनी रात्री उशिरापर्यंत काम केले. यामुळे त्या परिसरातील नागरिकांनी मनपाचे आभार मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR