नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पाकिस्तानने भारतावर सायबर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानी हॅकर्सनी भारतीय लष्कराचे संकेतस्थळ हॅक करण्याचा प्रयत्न केला आहे.
भारतीय लष्कर आपल्याविरोधात आक्रमक कारवाई करू शकते, या भीतीमुळे गाळण उडालेल्या पाकिस्तानकडून सायबर हल्ले सुरू झाले आहेत. पाकिस्तानने भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानने मागच्या दोन दिवसांत दोन वेळा भारतीय लष्कराच्या वेबसाईटवर सायबर हल्ला करून वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताच्या टेक तज्ज्ञांनी हे हल्ले हाणून पाडले आहेत.
भारतानेही पाकिस्तानची भारतामध्ये डिजिटल कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. काही पाकिस्तानी युट्युब चॅनेल्सवर बंदी घातल्यानंतर आता भारताने पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा एम. आसिफ यांच्या एक्स अकाऊंटला भारतामध्ये ब्लॉक केलं आहे. जम्मू काश्मीरबाबत चुकीची माहिती आणि खोट्या बातम्या पसरवल्याने तसेच भारतामध्ये दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर भारताकडून मोठी लष्करी कारवाई होण्याच्या भीतीने पाकिस्तानची गाळण उडाली आहे. यामुळे पाकिस्तानी सैन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर चलबिचल दिसत आहे. याचदरम्यान, भारताने पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांच्याविरोधात पाऊल उचलून त्यांचे एक्स अकाऊंट ब्लॉक केले आहे. भारत पाकिस्तानवर कधीही हल्ला करू शकतो, अशा परिस्थितीत लष्कराला पूर्णपणे सज्ज ठेवण्यात आले आहे, असे विधान ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी नुकतेच केले होते.