इस्लामाबाद : वृत्तसंस्था
पाकिस्तानच्या आण्विक क्षेपणास्त्र तयार करण्याच्या कार्यक्रमाला अमेरिकेने मोठा झटका दिला आहे. ट्रम्प प्रशासनाने कठोर पावले उचलताना क्षेपणास्त्र विकासाशी संबंधित पाकिस्तानातील ७ कंपन्यांवर कडक निर्बंध लादले आहेत.
अमेरिकेच्या उद्योग आणि सुरक्षा विभागाने १३ पेक्षा जास्त पाकिस्तानी कंपन्यांना आपल्या देखरेख यादीत समाविष्ट केले आहे. अण्वस्त्रविषयक धोकादायक उपक्रमांत सहभाग असल्याचा या कंपन्यांवर संशय आहे.
तसेच अमेरिकेने पाकिस्तानच्या इतर ७ कंपन्यांवर निर्बंध घातले आहेत. कारण या ७ कंपन्या पाकिस्तानच्या बॅलेस्टिक मिसाईल कार्यक्रमास मदत करत होत्या. या कंपन्या अमेरिकेची सुरक्षितता आणि परराष्ट्र धोरणासाठी धोकादायक ठरू शकतात, असे अमेरिकेने म्हटले आहे.
अमेरिकेने नुकत्याच निर्यात प्रशासन नियमांमध्ये केलेल्या बदलानंतर या कडक कारवाईची सुरुवात केली. याचा परिणाम चीन, पाकिस्तान, इराण, दक्षिण आफ्रिका आणि युएई यांसारख्या देशांमधील जवळपास ७० कंपन्यांवर झाला आहे.
ज्या कंपन्या अण्वस्त्र विकास कार्यक्रमाशी संबंधित आहेत त्यात ब्रिटलाइट इंजिनियरिंग, इंटेनटेक इंटरनॅशनल, इंट्रालिंक इनकॉर्पोरेटेड, प्रोक मास्टर, रहमान इंजिनियरिंग अँड सर्व्हिसेस इत्यादी कंपन्यांचा समावेश आहे.