अबोटाबाद : वृत्तसंस्था
पाकिस्तानात मोठ्या प्रमाणावर पासपोर्ट चोरीचे प्रकरण समोर आले आहे. अतिरेकी गड असलेल्या अबोटाबाद येथून ३२ हजार पासपोर्ट गायब झाले आहेत. पाकिस्तानच्या लोक लेखा समितीच्या अहवालातून ही बाब निदर्शनास आली. या अहवालानुसार पाकिस्तान सरकारची काही कारवाई करण्याची इच्छाही दिसत नाही.
पाकिस्तानात सध्या तहरीक-ए-तालिबान, लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद, एचएम, इसिसचे अतिरेकी गट सक्रीय आहेत. एकट्या टीटीपीजवळ ६००० अतिरेकी आहेत. या अतिरेक्यांजवळ हे पासपोर्ट गेले तर नाहीत ना असा सवाल केला जात आहे.
पाकिस्तानच्या लोक लेखा समितीचे अध्यक्ष तारिक फजल चौधरी यांची एक बैठक झाली. या बैठकीत पासपोर्ट महासंचालकांंनी नीट उत्तरे दिली नाहीत. या प्रकरणात सखोल चौकशी का झाली नाही यावरुन समिती नाराज झाली आहे. या पासपोर्टचा कुठे-कुठे दुरुपयोग होत आहे या संदर्भात कोणालाही कल्पना नसल्याचे समितीने म्हटले आहे.
अबोटाबादला पाकिस्तानचा अतिरेकी गड म्हटले जाते. २०११ मध्ये अमेरिकन फोर्सने येथेच अल कायदा संघटनेचा प्रमुख ओसामा बिन लादेन याची हत्या केली होती. अबोटाबाद हे खैबर पख्तूनख्वाचे एक शहर आहे. खैबर सध्या अतिरेक्यांच्या हालचालीने प्रभावित आहे. अशात अबोटाबाद येथून ३२ हजार पासपोर्ट गायब झाल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.